असरार संघावर मात करीत कुरैशी संघ अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:54 AM2019-01-22T00:54:20+5:302019-01-22T00:54:32+5:30
आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत कलीम कुरैशी संघाने अंतिम सामन्यात असरार इलेव्हन संघावर १९ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. अजय काळे सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
औरंगाबाद : आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत कलीम कुरैशी संघाने अंतिम सामन्यात असरार इलेव्हन संघावर १९ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. अजय काळे सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. कलीम कुरैशी संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ९ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून अजय काळेने ४१ चेंडूंत ९ चौकारांसह स्फोटक ५३ धावांची खेळी केली. त्याला प्रदीप जगदाळेने २९ चेंडूंत ३ चौकारांसह ३0 धावांची खेळी करीत सुरेख साथ दिली. सतीश भुजंगेने १६, वसीम खानने १२ व सय्यद परवेजने नाबाद १३ धावांचे योगदान दिले. असरार इलेव्हन संघाकडून खालीद झमानने २१ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात असरार इलेव्हन संघ १९.३ षटकांत १३0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून खालीद झमानने २४ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ३0, महेश म्हस्केने २६ व सलमान अहमदने २४ धावांचे योगदान दिले. कुरैशी संघाकडून अब्दुल वहीदने १६ धावांत ३ गडी बाद केले. त्याला सय्यद सर्फराज, इशांत राय व सय्यद परवेज यांनी प्रत्येकी २, तर प्रदीप जगदाळेने १ गडी बाद करीत साथ दिली. अंतिम सामन्यानंतर फय्याज खान, अयाज खान, इम्रान खान, रिझवान खान, डॉ. सय्यद मोईन, इरफान खान व फिरोज खान यांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला करंडक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे मानकरी
सामनावीर : अजय काळे
मालिकावीर : खालीद झमान
गोलंदाज : बासित अली
फलंदाज : वसीम अक्रम