Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतीचौकात राडा; मविआ - भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 12:40 PM2024-02-09T12:40:23+5:302024-02-09T12:40:49+5:30
दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी समोरसमोर येत जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
छत्रपती संभाजीनगर : शहारातील क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जोरदार घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांची एक फळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत करत आहे. दोन्ही बाजूंच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसळकर यांच्या हत्येवरून राज्यातील कायदा-सुवस्थेवर निदर्शने करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आज सकाळी ११ वाजता क्रांती चौकात जमले होते. याचवेळी भाजपचे कार्यकर्ते राहुल गांधी यांचा प्रधानमंत्री मोदी यांच्यावर केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी जमा झाले. मविआच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही कार्यकर्ते अचानक समोरसमोर आले. वेळीच पोलिसांनी धाव घेत दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दोन्ही बाजूची कार्यकर्ते माघार घेत नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मविआच्या कार्यकर्त्यांनी फक्त त्यांचेच कार्यकर्ते ताब्यात घेतल्याचा आरोप केला. काहीवेळाने तणाव निवळला.
राज्यात गुंडांची सुव्यवस्था - मविआ
राज्यात सर्वसामान्यांसाठी कायद्याचे राज्य राहिले नाही. मुख्यमंत्री यांचा बंगला गुंडांचा अड्डा झाला आहे. गृहमंत्री फडणवीस हे अकार्यक्षम आहेत. त्यांच्यामुळे गुंडांना सुव्यवस्था मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करत जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपकडून राहुल गांधींचा निषेध
कॉँग्रेस नेते राहुल गांधी कायम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतात, त्यांचा अवमान करतात याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते क्रांती चौकात जमले होते. भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.