दुचाकीचा धक्का लागल्यामुळे अंगुरीबागेत मध्यरात्री राडा; दोन गट समोरासमोर भिडले
By राम शिनगारे | Published: June 24, 2023 08:35 PM2023-06-24T20:35:27+5:302023-06-24T20:36:38+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव; गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अंगुरीबागमध्ये दोन गट समोरासमोर भिडले. त्यात दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली. त्यात एकजण जखमी झाला. घटनेची माहिती समजताच क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात एका गटाच्या सहा जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
क्रांतीचौक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये सय्यद इरफान सय्यद शहाबुद्दीन, सय्यद इमरान उर्फ इब्रान सय्यद शहाबुद्दीन, गुलाम मुजफर उर्फ बल्लू गुलाम समद, गुलाम अदनान गुलाम मोईन, अब्दुल रहेमान उर्फ गुड्डू अब्दुल नासेर आणि गुलाम मुदतशीर गुलाम समद (सर्व रा. अंगुरीबाग) यांचा समावेश आहे. क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर परदेशी हे अंगुरीबाग येथील त्यांच्या घरासमोर विजय काथार यांच्यासोबत गप्पा मारीत उभे होते. तेव्हा परिसरातच राहणाऱ्या सय्यद इरफान याने दुचाकीचा धक्का दिल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद सुरू केला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. तेव्हा इरफानने परदेशीच्या डोक्यात विट मारली. त्यात जखमी झाले. त्यानंतर जमावाने काथार यांच्या घरावरच हल्ला चढवला. घरासमोर उभ्या असलेल्या पाच दुचाकी गाड्या फोडल्या. तसेच काथार कुटुंबातील हर्षाली संजय काथार, सुधाकर काथार, सुनिता काथार, योगिता काथार यांनाही जमावाने शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती समजातच क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके, जग्गनाथ मेनकुदळे यांच्यासह पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचला. त्यांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणाला आणली. या प्रकरणात मयुर परदेशी यांच्या तक्रारीवरून दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला. तर फिर्यादींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नाेंदवला आहे.
घटनास्थळी पोलिस आयुक्त, उपायुक्तांची धाव
घटनेची पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त संपत शिंदे पोहचले होते. त्याचवेळी क्रांतीचौक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात दंगा काबू पथकासह कडक बंदोबस्त तैनात केला असून, तणावपूर्ण शांतता आहे. तसेच उर्वरित आरोपींचाही क्रांतीचौक पोलिस शोध घेत आहेत.