औरंगाबाद : महापालिकेच्या शहर बस सेवेत आणखी सुसूत्रता आणण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरच शहर बसची संख्या 90 पर्यंत जाणार आहे. बसेस स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात येणार आहे. जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळवण्यात येईल अशी माहिती महानगरपलिका आयुक्त निपुण विनायक यांनी दिली.
यासोबतच सध्या वापरण्यात येत असलेले तिकीट मशीन संदर्भात तक्रारी येत आहेत. अत्याधुनिक मशीन खरेदी करण्याचा संकल्पही आज मनपा आयुक्त डॉक्टर निपून विनायक यांनी व्यक्त केला. बसचे वेळापत्रक पाळण्यात येत नसल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी नमूद केले की लवकरच अमुलाग्र बदल दिसून येतील.
शहर बसचे नाही नियोजन केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेने २३ जानेवारीपासून शहरात ‘स्मार्ट बस’सेवा सुरू केली. ही सेवाही एस.टी. महामंडळासारखीच सुरू आहे. यामध्ये कुठेच ‘स्मार्ट’पण पाहायला मिळत नाही. २२ मार्गांवर ४९ बस सध्या धावत आहेत. त्यातील बहुतांश फेऱ्या रिकाम्याच असतात. प्रवाशांना कोणत्या स्टॉपवर बस किती वाजता येईल, हेच माहीत नाही. त्यामुळे बसची वाट पाहून कंटाळलेले प्रवासी अधिक पैसे देऊन रिक्षाने प्रवास करणे पसंत करीत आहेत.
५० टक्के फेऱ्या रिकाम्या धावतात महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेत तब्बल १०० बस खरेदी केल्या आहेत. बस चालविण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळावर सोपविली आहे. मागील सात महिन्यांमध्ये या बससेवेचा २१ लाख ८३ हजार प्रवाशांनी फायदा घेतल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. १३ लाख ५३ हजार ३५२ किलोमीटर अंतर बसने पूर्ण केले. २२ मार्गांवर ४९ बस धावत आहेत. बहुतांश बस ५५ ते ६१ टक्के रिकाम्याच धावतात. कारण महापालिकेने कुठेच बसस्टॉप तयार केले नाहीत.
सात महिन्यांत अडीच कोटी जमा२३ जानेवारी ते १६ आॅगस्टपर्यंत तिकिटातून २ कोटी ५६ लाख ८५ हजार ३०६ रुपये तिजोरीत जमा झाले. यात सर्वाधिक ४९ लाख रुपये जुलै महिन्यात मिळाले असून, आॅगस्ट महिन्याचा आकडा ६० लाखांच्या घरात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित बस सुरू करण्यासाठी १८६ चालक-वाहकांची आवश्यकता असून, त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.