रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग’वर; तिकिटासाठी आमदार, खासदारांचे पत्र आणा, नाही तर एजंटकडे जा !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 02:12 PM2022-05-10T14:12:03+5:302022-05-10T14:12:29+5:30
धक्कादायक म्हणजे थोडे जास्त पैसे मोजल्यास एजंटकडून तिकिटाची हमी मिळते
औरंगाबाद : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई, हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वेचे आगामी काही दिवसांतील स्लीपर, एसीसह सर्वच श्रेणींचे आरक्षण फुल्ल झाले आहे. अजमेरला जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण जून महिन्यापर्यंत वेटिंगवर असल्याने प्रवाशांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. ऐन वेळी प्रवास करावा लागत असल्याने अनेक जण आमदार, खासदार व रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासह पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बहुतेक जणांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच विविध ठिकाणी जाण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे त्यांनी पुढील दोन ते तीन महिन्यांनंतरचे आरक्षण करून ठेवले. परंतु ऐन वेळी कामानिमित्त मुंबई व इतर ठिकाणी जाणाऱ्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्टेशनवर रेल्वे येण्याच्या वेळेत प्लॅटफाॅर्मवर पाय ठेवायलाही जागा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. बहुतांश रेल्वे प्रवाशांनी भरून धावत आहे.
रेल्वेचे तिकीट मोबाईलवर बुक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्याबरोबर रेल्वे स्टेशनवर आरक्षण कार्यालयातून तिकीट काढता येते. परंतु आजघडीला अनेक रेल्वेंचे आरक्षण वेटिंगवर असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्यामुळे प्रवास कसा करावा, असा प्रश्न प्रवाशांपुढे उभा राहत आहे. अशा वेळी आमदार, खासदार व रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळवण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जात आहे. तर काहींनी थेट एजंटचा रस्ता धरला आहे. थोडे जास्त पैसे माेजले की, एजंटच्या माध्यमातून अगदी सहजपणे तिकीट मिळत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
या रेल्वेंचे आरक्षण वेटिंगवर
मुंबईला जाणारी राज्यराणी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसचे आगामी काही दिवसांतील आरक्षण वेटिंगवर गेले आहे. त्यानंतर हैदराबादकडे जाणाऱ्या औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसचेही आरक्षण वेटिंगवर आहे. ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेसचे १ जूनपर्यंतचे आरक्षण वेटिंगवर आहे.