छत्रपती संभाजीनगर : मागील महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने इंद्रधनुष्य लसीकरणाची विशेष मोहीम फत्ते करण्यासाठी कंबर कसली होती. लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके, गरोदर माता यांचे अगोदर सर्वेक्षण करून संख्या निश्चित केली. ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल १० हजार ७२१ बालके, तर सुमारे २ हजार गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, नियमित लसीकरण मोहिमेच्यावेळी कोणी बाहेर गावी असल्यामुळे, तर कोणी कंटाळा केल्यामुळे अनेक बालके व गरोदर माता लस घेण्यापासून वंचित राहिल्या होत्या. केंद्र सरकारने लसीकरणापासून वंचित राहिलेल्या माता व बालकांसाठी मिशन इंद्रधनुष्य लसीकरण ही विशेष मोहीम राबवून त्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली.
त्यापूर्वी आरोग्य विभागाने लसीकरण करणाऱ्या आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले. सर्वेक्षणामध्ये वंचित बालके आणि मातांच्या संख्येनुसार लसीकरण बूथ स्थापन केले. त्यानंतर जिल्ह्यात ७२३ बूथ व ३०२ मोबाईल टीमच्या माध्यमातून सलग ६ दिवस लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वंचित गरोदर माता-बालकांसह नियमित माता-बालकांचेही लसीकरण करण्यात आले. यामध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ६ हजार ५७९ बालके, १ ते २ वर्ष वयोगटातील २ हजार ९८९, २ ते ५ वर्ष वयोगटातील १ हजारा १५३, असे एकूण १० हजार ७२१ बालके आणि १९९३ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले.
इंद्रधनुष्य विशेष लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यात आरोग्य विभागाला उद्दिष्ट पूर्ण करता आले. जि. प.च्या आरोग्य विभागाने ९२८३ बालके आणि १८९१ गरोदर मातांचे, तर जिल्हा शल्यचिकित्सक विभागाने १४३८ बालके आणि १०२ गरोदर मातांचे लसीकरण केले. दुसरा टप्पा ११ ते १६ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर दरम्यान राबविला जाणार आहे.