औरंगाबाद : राणा दाम्पत्य हनुमान चालीसा वाचतायत याच्याशी सर्वसामान्यांना काही देणेघेण नाही. आजूबाजूला जो बोगसपणा सुरु आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनदिन जीवनात काय बदल होणार आहे ? राज्यातील जनतेला हे सर्व पहावे लागते, ही फार मोठी शोकांतिका आहे. राज्य भारनियमनमुक्त व्हावे यासाठी सर्वपक्षांनी पुढाकार घ्यावा, शेती प्रश्नांवर बोलावे, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी आज केले. ते शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यम प्रतिनिधींची बोलत होते.
मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या कारणावरून मुंबईत मोठा राडा झाला. यात राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहे. यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी अत्यंत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात सध्या भारनियमन सुरु आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी त्रस्त आहे. तसेच दुध दराचा प्रश्न आहेच. यावर कोणी बोलत नाही हे दुर्दैव आहे. सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोले पाहिजे. सध्या जे सुरु आहे त्याचा सर्वसामान्यांशी काही संबंध नाही. राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा पठणाने शेतकऱ्यांच्या जीवानात काही फरक पडणार नाही, असा टोलाही खासदार सुजय विखे यांनी लगावला.
राष्ट्रवादी शिवसेनेला दोन वर्षात संपवणार एकीकडे एका पक्षांचे कार्यकर्ते नेत्याला सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा संकल्प मेळावा सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना संपविण्यासाठी अग्रेसर आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळायला हव. त्यांनी आज जर यावर निर्णय घेतला नाही तर दोन वर्षात शिवसेना राहणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजेंडा शिवसेना संपविण्याचा आहे. तो त्यांनी वेळीच ओळखावा. जेवढ्या लवकर शिवसेना हा अजेंडा ओळखेल तेवढ्या लवकर पक्ष सावरले, असा सल्लाही खासदार सुजय विखे यांनी दिला.