औषधाच्या बहाण्याने नशेच्या गोळ्या चारत विभक्त पत्नीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 06:08 PM2022-12-13T18:08:03+5:302022-12-13T18:08:31+5:30
याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
सिल्लोड (औरंगाबाद) : चार वर्षांपासून पतीपासून विभक्त असलेल्या पत्नीला नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याप्रकरणी पतीविरुद्ध सिल्लोड शहर पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ डिसेंबरच्या रात्री पीडित महिलेच्या घरी घडली.
पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेख फराज याच्याशी आपला २५ मे २०१७ रोजी औरंगाबाद येथे विवाह झाला. लग्न झाल्यावर सहा महिने सर्वकाही चांगले चालले. त्यानंतर सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. यासंदर्भात महिलेने सासरच्या लोकांविरुद्ध मनमाड येथे सन २०१८ मध्ये शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्यादही दिली होती. त्यावरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हेही दाखल झाले होते. तेव्हापासून ती सिल्लोड येथे वडिलांच्या घरी विभक्त राहू लागली. ४ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजता पीडिता घरी एकटीच होती.
याच दरम्यान, पती शेख फराज हा तेथे गेला, तिचे डोके दुखत होते म्हणून त्याने पत्नीला डोक्याच्या म्हणून नशेच्या गोळ्या दिल्या व तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. ५ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता तिची नशा उतरल्यावर या दोघांत भांडण झाले. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी तिने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज करीत आहेत.
गोळी देण्याच्या बहाण्याने गेला घरी
फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी असून, त्यांच्यात पटत नसल्याने ते एकमेकांपासून वेगळे राहतात. आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन डोक्याची गोळी देण्याच्या बहाण्याने फिर्यादीस नशेची गोळी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तसेच तिला शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे वरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अशोक मुदिराज, पोलिस निरीक्षक, सिल्लोड शहर.