लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागात दाखल एका रुग्णाला पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. हात आणि डोळे निळे पडलेल्या या रुग्णाला काळ्या रंगाची लघवी होते. पायाच्या सांध्यांतून आवाजही होतो. अनुवंशिक असलेला हा आजार सव्वालाख लोकांमध्ये एखाद्यास होतो. घाटीतील प्रत्येक डॉक्टरसाठी हा आजार अभ्यासाचा विषय बनला आहे.गंगापूर तालुक्यातील मुद्देशवडगाव येथील ४७ वर्षीय मच्छिंद्र भुसारे असे मेडिसीन विभागात उपचार घेत असलेल्या या रुग्णाचे नाव आहे. भुसारे यांना अल्कॅप्टोन युरिया नावाचा अतिशय दुर्मिळ आजार झाला आहे. हा आजार अनुवंशिक असून, सव्वालाखात एखाद्यास तो होत असल्याचे विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. या आजारामुळे या रुग्णाच्या शरीरातील सर्व सांध्यांतील गॅप नष्ट होतो. त्यामुळे शरीराचा कोणताही भाग हलवताना हाडांचा कडकड आवाज होतो. थंडीमुळे रात्रीच्या वेळी सर्व अवयव आकुंचित होतात.सदर रुग्णाला २००८-०९ मध्ये त्रास सुरू झाला. सुरुवातीला पाठदुखीमुळे अस्थिरोगतज्ज्ञांकडे उपचार सुरू केले. पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रियादेखील झालेली आहे; परंतु आराम मिळत नसल्याने विविध ठिकाणी उपचार घेतले. आता घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी या दुर्मिळ आजाराचे निदान केले. हा आजार अनुवंशिक असल्याने रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. खलील अहेमद, डॉ. सुदाम लगास, डॉ. संदेश मालू यांच्यासह वॉर्ड क्रमांक १ आणि ५ मधील नर्सिंगचे कर्मचारी रुग्णांच्या उपचारासाठी परिश्रम घेत आहेत.२५ वर्षांत पहिला रुग्णअशा प्रकारचा रुग्ण मी २० ते २५ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच पाहिला आहे. दोन सांध्यांमध्ये गॅप असतो, त्यामुळे त्यांच्या सर्व क्रिया अतिशय सहज होतात; परंतु या आजाराने रुग्णाच्या शरीरातील सर्व सांध्यांतील गॅप नष्ट होतो. त्यामुळे शरीराचा कोणताही भाग हलवला की हाडांचा कडकड आवाज येतो.-डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, औषधवैद्यकशाास्त्र विभाग, घाटी
दुर्मिळ आजाराने हात, डोळे पडले निळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:19 AM