औरंगाबाद : आरएसएसप्रणीत भाजपचे मनुवादी सरकार देशात पुन्हा नको हीच आमची स्पष्ट भूमिका असून, आम्ही काँग्रेससोबत असल्याचे आज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जाहीर केले.ते दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. त्यांनी सांगितले की, आमच्या पक्षाची आघाडी काँग्रेससोबत आहे. आम्ही काँग्रेसकडे लोकसभेच्या सहा जागांची मागणीही केली आहे. सध्या त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. विदर्भातील चार, मराठवाड्यातून एक व उत्तर महाराष्टÑातून एक जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे.रिपब्लिकनांना वंचित ठेवलं जातंय.. चौकट....वंचित आघाडीचा प्रयोग यापूर्वी हाजी मस्तान यांच्यासमवेत आम्ही केला होता. आताच्या वंचित आघाडीतून रिपब्लिकनांनाच वंचित ठेवलं जातंय. बाळासाहेब आंबेडकर यांना नक्षलवादी, माओवादी, कम्युनिस्ट ते एमआयएम सारे चालतात. पण रिपब्लिकन पक्ष मात्र चालत नाही. रिपब्लिकन ऐक्यासाठी बाळासाहेबांनी पुढाकार तर घेऊन पाहावं! चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.उद्धव ठाकरे आरत्या करीत फिरत आहेत. त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. लोकशाहीची, समतेची, बंधुतेची पूजा करावी लागते. ती आम्ही करतो, असा टोला कवाडे यांनी लगावला. हनुमानाची जात काय काढता? पूर्वी असं कधी घडत नव्हतं. देवाच्या जाती काढून त्यावर चर्चा करणारे लोक ढोंगी असून, त्यापेक्षा जातिव्यवस्था संपविण्यासंबंधीची चिकित्सा झाली पाहिजे, यावर कवाडे यांनी भर दिला.१९८१ पासून मी दरवर्षी भीमा कोरेगावला जातो. शौर्य दिनाची सुरुवातच आम्ही केली. यावर्षीही मी भीमा कोरेगावला जाणार. सभा घेण्यासाठी आम्हाला अद्याप तरी परवानगी मिळालेली नाही. पण यावर्षी गतवर्षाप्रमाणे भीमा कोरेगावला काही गडबड होईल, असे वाटत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अंबानी मार्गे पैसा मिळावा यासाठी पंतप्रधानांनी केलेला घोटाळा म्हणजे राफेल घोटाळा होय, अशी टीका करीत कवाडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हे बॅरिस्टर आहेत. त्यांची भाषणे मी ऐकली आहेत. त्यावरून संविधानावर त्यांचा विश्वास आहे, असे मला वाटते.गोपाळराव आटोटे, अॅड. जे. के. नारायणे, गणेश पडघन, अॅड. सोनाली अहिरे, अशोक जाधव, सागर कुलकर्णी, लक्ष्मण कांबळे, विजया दाभाडे, राजू जाधव, शेषराव सातपुते, प्रकाश जाधव, जालिंदर इंगोले आदींची यावेळी उपस्थिती होती.----------------
‘आरएसएसप्रणीत भाजपचे मनुवादी सरकार पुन्हा नको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:45 PM
आरएसएसप्रणीत भाजपचे मनुवादी सरकार देशात पुन्हा नको हीच आमची स्पष्ट भूमिका असून, आम्ही काँग्रेससोबत असल्याचे आज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जाहीर केले.
ठळक मुद्दे जोगेंद्र कवाडे : काँग्रेसकडे सहा जागांची केली मागणी