बाजारसावंगी : स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना बळजबरी मका वाटप केला जात आहे. ग्रामीण भागात मका खात नसल्याने या मक्याचे करायचे काय, असा प्रश्न शिधापत्रिकाधारक विचारत असून, तिचे वाटप बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, साखर, तांदळासोबतच मक्याचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिकाधारकांना नको म्हटले तरी, बळजबरीने मका वाटप करीत आहेत. ज्या शिधापत्रिकाधारकांकडे बैल, गाय, आदी जनावरे आहेेत, किंवा ज्याचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे, त्यांना मका फायद्याची पडते. मात्र, ज्यांच्याकडे जनावरे नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना भेटलेला मका त्रासदायक ठरत आहे. यापूर्वी स्वस्त धान्य दुकानांतून प्रतिव्यक्ती तीन किलो गहू दोन रुपये प्रतिकिलोने, तर दोन किलो तांदूळ तीन रुपये प्रतिकिलोने मिळत असे, महाराष्ट्रातील गोरगरिबांचे बाजरी ज्वारी व गहू हे मुख्य अन्न असताना शासनाने यात बदल करीत आता प्रतिव्यक्ती एक किलो गहू, दोन किलो मका व दोन किलो तांदूळ असे धान्य वितरण करण्याचे आदेश दिलेले आहेत. एरवी मका हे पशूंना भरडून खाऊ घालण्याचे खाद्य असताना व त्याचा राज्यातील नागरिक खाण्यासाठी वापर करीत नसताना शासन मका शिधापत्रिकाधारकांच्या का माथी मारत आहे. हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मकाऐवजी गव्हाचे वाटप करावे, अशी मागणी शिधापत्रिकाधारक करीत आहे.
चौकट
बहुतांशवेळा कीड लागलेले धान्य
स्वस्त धान्य दुकानांवर अनेकवेळा वाटप करण्यात आलेली मका व इतर धान्य हे कीड लागलेले मिळत असल्यानेही शिधापत्रिकाधारक त्रस्त आहेत. अनेकवेळा तर धान्याला किडीचे प्रमाण एवढे माेठे होते की, ते जनावरेही खात नसत, तर माणसे कशी खाणार असे मत शिधापत्रिकाधारक व्यक्त करीत आहेत.