भाड्याने माणसे, वाहने नेण्याची खऱ्या शिवसेनेला गरज नाही; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला
By बापू सोळुंके | Published: September 30, 2022 02:19 PM2022-09-30T14:19:17+5:302022-09-30T14:24:30+5:30
शिवसैनिक सोबत चटणीभाकर घेऊन उत्स्फूर्तपणे मेळाव्याला जात असतो. यापुढेही जात राहील.
औरंगाबाद: मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे, या मेळाव्याला दरवर्षी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक आणि नागरिक उत्स्फूर्तपणे जातात. त्यामुळे शिवसेनेला भाड्याने माणसे आणि वाहने घेऊन जाण्याची गरज नसल्याचा टोला, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लगावला.
मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळाव्याला जास्तीतजास्त लोक येथून नेण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. यासाठी शुक्रवारी शहरातील शिवसेनेच्या क्रांती चौक येथील संपर्क कार्यालयात औरंगाबाद मध्य आणि पश्चिम विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर पूर्व विभागाची बैठक पुंडलिकनगर येथील मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीप्रसंगी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले बंडखोर गटाने मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन केल्याचे आणि या मेळाव्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एसटी महामंडळाला पत्र देऊन बसची मागणी केल्याचे पत्र व्हायरल झाले. मात्र यासाठी पैसे भरल्याची पावती मात्र त्यांनी टाकली नाही. शिंदे गट 25 हजार लोकांना दसरा मेळाव्याला नेणार असल्याचे आणि याकरिता काही वाहने बुक केल्याच्या बातम्या वाचल्या. शिवसेनेला अशा प्रकारे दसरा मेळाव्यासाठी माणसे आणि गाड्या भाड्याने घेण्याची गरज पडली नाही.
शिवसैनिक सोबत चटणीभाकर घेऊन उत्स्फूर्तपणे मेळाव्याला जात असतो. यापुढेही जात राहील. आजच्या बैठकीत केवळ जास्तीत जास्त शिवसैनिक आणि नागरिकांनी मुंबईला जाण्याचे नियोजन करावे, हे सांगण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी दानवे यांनी उपस्थित प्रत्येकानी दहा जण मुंबईला घेऊन जायचे असल्याचे सांगितले. या मेळाव्यास राजू वैद्य, संतोष खेडके, ज्ञानेश्वर डांगे, वामनराव शिंदे, दिग्विजय शेरखाने, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिभा जगताप, माजी महापौर कला ओझा, मीरा देशपांडे आदी उपस्थित होते.