लातूर : लातूर जिल्ह्यात रमजान ईद मंगळवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील इदगाह मैदानावर सकळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी यांनी लोककल्याणासाठी तसेच पाऊस पडावा, देशाची व लातूर शहराची शांतता कायम रहावी यासाठी दुवा मागीतली़ ९़३० ते १० वाजेपर्यंत बयान झाले़ त्यानंतर समाजबांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या़ वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला होता़राज्यमंत्री अमित देशमुख यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ मौलाना मुस्तफा मजाहिरी यांनी नमाज पठण केले़ यावेळी बयान करताना मौलाना इस्माईल कास्मी म्हणाले़, जकात देणे ही चांगली बाब आहे़ प्रत्येकाने आपआपल्या परिने जकात दिली पाहिजे़ प्रत्येकाची ती बांधिलकी आहे़ देशात शांतता व सुव्यवस्था राखण्याचीही जबाबदारी प्रत्येकांची आहे़ सध्या पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल़ देशाचे वातावरण पोषक राहण्यासाठी सर्वांनी भाईचारा जपायला हवा़ त्यातूनच सर्व लोकांचे कल्याण व्हावे, देशात शांतता नांदावी अशी प्रार्थनाही मोलाना इस्माईल कास्मी यांनी केली़यावेळी इदगाह मैदानावर आ़वैजनाथ शिंदे, जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा, पोलिस अधीक्षक बी़जीग़ायकर, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़विश्वंभर गावंडे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, अॅड़व्यंकट बेद्रे, अॅड़अण्णाराव पाटील, बसवंतअप्पा उबाळे, संजय बनसोडे, नगरसेवक मकरंद सावे, राजा मनियार, अॅड़समद पटेल, अजगर पटेल, राम कोंबडे, अॅड़बी़व्ही़ मोतीपवळे, धोंडिराम यादव यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा प्रचंड मोठा जनसमुदाय होता़ नमाज अदा केल्यानंतर प्रत्येकांनी पाऊस पडावा म्हणून दुआ मागितली़बार्शी रस्त्यावर दयानंद महाविद्यालयासमोर ईदगाह मैदान असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बदलण्यात आली होती़ सकाळी ८ वाजल्यापासूनच या रस्त्यावरील वाहतुक समांतर रस्त्यावरून वळविण्यात आली होती़ ११ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्यानेच झाली़ (प्रतिनिधी)शिरखुर्म्याचा आस्वाद़़़ रमजान ईद या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देणे दिवसभर सुरू होते़ त्याचबरोबर गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेणेही दिवसभर सुरूच होते़ नातेवाईक व ईष्टमित्रांना निमंत्रण दिलेले होते़ शिरखुरमा या आवडीच्या पदार्थासाठी आग्रह केला जात होता़ गुलगुले, शिरखुर्मा, भजे, शंकरपाळे अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत यंदाची ईद उत्साहात साजरी झाली़ गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या़
पावसासाठी घातले ‘अल्लाह’ला साकडे
By admin | Published: July 30, 2014 12:16 AM