बीड : प्रसवकळा सोसत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बहुतांश महिलांची प्रसुती तर दुरच; परंतु साधी तपासणीही होत नाही़ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी प्रसुती वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेला केंद्राच्या दारातूनच तालुका, जिल्हा रुग्णालयात ‘रेफर’ (रुग्ण दुसऱ्या दवाखान्यात पाठविणे) करतात़ त्याचाच परिणाम म्हणजे जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६० उपकेंद्रांमध्ये सरत्या वर्षात एकाही महिलेची प्रसुती झालेली नाही़ आरोग्य विभागाच्या अहवालातूनच ही धक्कादायक माहिती समोर आली़जननी- शिशू सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर माता, नवजात शिशूंना घरापासून रुग्णालयात पोहोचविण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर मोफत वाहनव्यवस्था आहे़ जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये प्रसुती सुविधा उपलब्ध आहेत़ मात्र, काही आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांतील उपकेंद्रांत आलेल्या महिलांना जिल्हा रुग्णालय, स्वाराती रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये किंवा खासगी दवाखान्यांत ‘रेफर’ करुन स्वत:ची जबाबदारी झटकली जाते हा सार्वत्रिक अनुभव! वर्षभरात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये ४५ हजार प्रसुती व्हाव्यात असे लक्ष्य होते; परंतु केवळ १५ हजार इतक्या प्रसुती झाल्या आहेत़ तर उर्वरित महिलांना प्रसुतीसाठी आरोग्य केंद्रांऐवजी पर्यायी दवाखान्यांत जावे लागले़रात्री- अपरात्री प्रसवकळा जाणवू लागल्यानंतर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीचे उपचार मिळणे अपेक्षित आहे़ त्यामुळे माता व बाळ या दोघांचेही जीव सुरक्षित राहू शकतात;परंतु सुविधेअभावी अनेक जण खासगी दवाखान्यात जाणे पसंत करतात तर काही जणांना जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नसतो़ (प्रतिनिधी)
‘रेफर’ने वाढविल्या प्रसव वेदना !
By admin | Published: January 14, 2015 12:23 AM