सोयगाव : नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गटातील शेतकरी सदस्यांना शासनाच्या बांधावर खते योजनेतून थेट लाभ मिळणार आहे. मंगळवारी झालेल्या जिल्हा कृषी विभागाच्या ऑनलाईन बैठकीत या योजनेच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर दिलासा मिळण्यासाठी शासनाकडून बांधावर खते योजना राबविण्यात येणार असून या योजनेची कार्यवाही बुधवारपासूनच हाती घेण्यात येणार आहे. नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गटांकडून अर्ज मागविण्यात येणार असून या गटातील शेतकरी सदस्यांचे आधार क्रमांक याला जोडले जातील. तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे खतांची मागणी नोंदविताना जमीन क्षेत्राची माहिती जोडण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष
खते आणि बियाण्यांच्या विक्रीसाठी काळाबाजार रोखण्यासाठी तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून या नियंत्रण कक्षावर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निरसन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका कृषी विभागाच्या भरारी पथकाने बियाणे व खतांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात लक्ष केंद्रित करण्याचे सांगण्यात आले आहे.