औरंगाबाद : पहिल्या पत्नीला सोडून दुसरीसोबत घरोबा करणाऱ्या रिक्षाचालकास त्याच्यासासरच्या मंडळींनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याला हर्सूल येथे नेऊन त्याच्या पत्नीसोबत डांबून ठेवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी हर्सूल येथे जाऊन जखमी रिक्षाचालकाची सुटका करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
शोएब खान (वय २७,रा.बायजीपुरा)असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, शोएब हा रिक्षा चालक असून त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. एक मुलगा पाच वर्षाचा तर दुसरा आठ महिन्याचा आहे. दोन्ही मुले आणि पत्नीला हर्सूल येथील माहेरी सोडून देऊन शोएबने दुसऱ्या एका महिलेसोबत घरोबा केला होता. तो दुसऱ्या महिलेसोबत मिसारवाडीतील गल्ली नंबर १० मध्ये राहत होता. ही बाब त्याची पत्नी आणि सासरे, साले यांना मंगळवारी रात्री माहित झाली. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास शोएब त्याच्या प्रेयसीसोबत मिसारवाडीत असल्याची माहिती मिळताच त्याची पत्नी , साला आणि अन्य नातेवाईकांनी तेथे धावा बोल केला. सर्वांनी मिळून शोएबला बेदम चोप दिला.
या घटनेत त्याच्या डोक्याला मोठी जखम झाल्याने तो रक्त बंबाळ झाला, शिवाय त्याच्या हाता-पायालाही जोरदार फटके मारण्यात आल्याने गुडघ्यातून रक्तस्त्राव होत होता. शोएब गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी आरोपींनी त्याला हर्सूल येथे नेऊन त्याच्या पत्नीसोबत खोलीत डांबून ठेवले.
दरम्यान, बुधवारी सकाळी मिसारवाडीतील नागरिकांनी सिडको पोलिसांना फोन करून एका तरूणाचा खून करून काही जणांनी त्याचे प्रेत सोबत नेल्याचे कळविले. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि डी.बी.पथकातील कर्मचाऱ्यांनी मिसारवाडीत धाव घेतली. तेव्हा शोएबच्या प्रेयसीच्या घरात रक्ताचे डाग पडलेले दिसले. पोलिसांनी तपास करून हर्सूल येथील एका घरातून जखमी शोएबची मुक्तता केली. त्याला ताब्यात घेऊन प्रथम ठाण्यात आणले आणि तेथून लगेच घाटीत दाखल केले. शोएबच्या एका साल्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.