औरंगाबाद : आयसीयुमध्ये उपचारादरम्यान रुग्ण दगवल्याने नातेवाईकांनी घाटी रुग्णालयातील मेडिसिन इमारतीमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी ३ वाजेच्या सुमारास घडली. नातेवाईकांनी मुख्य दरवाजा, डॉक्टरांच्या कॅबीनची तोडफोड केली. यावेळी दोन सुरक्षा रक्षकांनाही मारहाण करण्यात आली असून इमारतीमध्ये काचांचा खच साचला आहे.
अचानक झालेल्या या प्रकारावर डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, लोटाकारंजा येथील एक ४० वर्षीय रुग्ण ११ जानेवारीला उपचारासाठी दाखल झाला होता. रुग्णास हृद्यविकाराचा तीव्र झटका आला असून त्याची तब्येत खालावली असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. मात्र खळवल्याची जाणीव रुग्णांना अगोदरच करून दिली होती. मात्र, रुग्ण भरती झाला तसा रुग्णाचे १५ ते २० नातेवाईक नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांना दमदाटी करत होते. त्यांना समजून सांगितल्यावरही ऐकत नव्हते.
दरम्यान, सोमवारी ( दि. १३) दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान तो रुग्ण उपचारादरम्यान दगावला. याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आयसीयूच्या नर्सिंग विभाग, निवासी डॉक्टर कक्ष आणि प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. तसेच त्यांना थांबविण्यास गेलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनासुद्धा त्यांनी मारहाण केली. त्यांचा धिंगाणा पूर्ण इमारतीमध्ये सुरु होता. सर्व इमारतीमध्ये काचाचा खच पडल्याचे चित्र असून या प्रकरणाची माहिती तातडीने बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली आहे.