औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर जामिनावर सुटलेल्या चारही आरोपींचा जामीन पोलिसांच्या प्रयत्नामुळे शुक्रवारी न्यायालयाने रद्द केला. आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात करण्याचे आदेश दिले.
औषधी दुकानदार मंदार अनंत भालेराव (वय २९, रा.शिवाजीनगर), अभिजित नामदेव तौर (३३, रा. सहयोगनगर), मिनी घाटीचा कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोते (४०, रा. शिवाजीनगर) आणि दीपक सुभाषराव ढाकणे (३२, रा. यशोदा कॉम्प्लेक्स, बीड), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कोविड रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करताना पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींना १६ एप्रिल रोजी अटक केली होती. चार दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर २० एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. आरोपींना जामीन मिळाल्याचे समजल्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी या गुन्ह्याची फाईल मागवून घेतली. यानंतर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडे देण्यात आला. सपोनि सोनवणे यांनी आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आणि याविषयी त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले.
सरकारतर्फे युक्तिवाद करताना न्यायालयास सांगितले की, साथरोगात जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या या आरोपींची आहे. असे असताना त्यांनी पैशांसाठी रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू केला. त्यांना जामीन दिल्यावर समाजात चुकीचा संदेश जाईल. यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्याची विनंती केली. उभयपक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपींचा जामीन रद्द केला. न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावत त्यांची रवानगी हर्सूल जेलमध्ये करण्याचे आदेश दिले.