Remdesivir Stolen : रेमडेसिविर इंजेक्शन चोरी प्रकरणात मनपाचे दोन अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:32 AM2021-05-04T11:32:18+5:302021-05-04T11:36:13+5:30
Remdesivir Stolen Case : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटल येथे ४८ रेमडेसिविर इंजेक्शन गहाळ झाले आहेत.
औरंगाबाद: महापालिकेच्या औषधी भंडारातून ४८ रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी सोमवारी मनपाचे मुख्य औषध निर्माता अधिकारी विष्णू दगडू रगडे (मारोतीनगर, मयूरपार्क) आणि कंत्राटी साहाय्यक औषध निर्माण अधिकारी प्रणाली शेषराव कोल्हे (मयूरपार्क) यांना अटक केली. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटल येथे ४८ रेमडेसिविर इंजेक्शन गहाळ झाले आहेत. याप्रकरणी मनपाचे औषधी भांडार नियंत्रक डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी केलेल्या चौकशीत हे इंजेक्शन भवानीनगर येथील मनपाच्या औषधी भांडारातून चोरीला गेल्याचे समोर आले. याविषयी त्यांनी रविवारी रगडे आणि कोल्हेविरुद्ध रविवारी गुन्हा नोंदविला. महापालिकेच्या जुना मोंढा भवानीनगर येथील औषधी भांडार कक्षातून काही औषधींचा पुरवठा मेल्ट्रॉन कोविड सेंटर येथे करण्यात आला होता. या तपासणीत एका बॉक्समध्ये रेमडेसिविरचे ४८ इंजेक्शन कमी आढळून आले.
आरोपींनी इंजेक्शनचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी रगडे आणि कोल्हे यांना अटक केली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक साईनाथ गिते हे तपास करीत आहेत.