औरंगाबाद: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेमडेसिविर इंजेक्शनचे आवक-जावक रेकॉर्ड जप्त केले. कोविड वॉर्डात कार्यरत असलेल्या डॉक्टर, कर्मचारी आणि आरोपीच्या परिचारक पत्नीचा जबाब नोंदविला.
कोविड रुग्णाला ३५ हजार रुपये प्रति नग या दराने रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा ४ मे रोजी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी संदीप आप्पासाहेब चवळी, गोपाल हिरालाल गांगवे आणि परभणी येथील नर्सचा पती माधव अशोक शेळके हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. आरोपी शेळकेने ही इंजेक्शन परभणी येथील जिल्हा रुग्णालयातून चोरल्याची कबुली दिली होती. फौजदार विकास खटके, हवालदार डोईफोडे आणि कॉन्स्टेबल माया उगले यांचे पथक शुक्रवारी आरोपी शेळके याला घेऊन परभणी येथे गेले होते. या पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधी स्टोअरच्या आवक-जावकचे सर्व रेकॉर्ड पंचनामा करून जप्त केले. कोविड वॉर्डातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविला. आरोपी शेळकेच्या पत्नीचाही जबाब नोंदवून नोटीस बजावली. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पोलिसांना आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध केल्याचे सूत्राने सांगितले.
२७ एप्रिल ते ४ मे दरम्यान कोविड वॉर्डातील रुग्णांची माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, दोन दिवसांत ही माहिती पोस्टामार्फत पाठविण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी पोलिसांना सांगितले. कोविड वॉर्डातील रुग्णाना इंजेक्शन चोरल्याचे आरोपी शेळके याने पोलिसांना कबुली दिली. मात्र रुग्णालयाला मिळालेले रेमडेसिविर आणि त्यांनी रुग्णांना वापरलेले रेमडेसिविर यात काहीही गडबड नसल्याचे कागदपत्रावरून दिसते, असे सूत्राने सांगितले. यावरून इंजेक्शन चोरीस गेल्याचे लपविण्यासाठी इंजेक्शन रुग्णांना दिल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.