औरंगाबाद : केंद्र शासनाच्या निधीतून एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला तर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी मराठवाड्यातील खासदार, आमदार त्याला घरी बोलावतात. अगोदर आमचे ‘काम’कर मगच पुढे विकासकामाला सुरुवात कर, असा अजब आग्रह धरतात. त्यामुळे मराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार अक्षरश: कामे सोडून पळून जात आहेत. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.
मासिआतर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की, वेरूळ-अजिंठासारखी पर्यटनस्थळे औरंगाबादला लाभली आहेत. पर्यटन उद्योग बहरण्यास भरपूर वाव आहे. औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम सुरू केले. कंत्राटदार अर्धवट काम सोडून पळून गेला. आता दुसरा कंत्राटदार नेमून काम करून घेण्यात येत आहे. मराठवाड्यात कंत्राटदाराला त्रास देण्याची पद्धत अतिशय वाईट आहे. जे लोकप्रतिनिधी त्रास देतात त्यांना पकडा, असेही मी सीबीआय संचालकांना सांगितले आहे.जुनी वाहने भंगारात टाकण्याची योजना आणण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांचे सुट्टे भाग अधिक स्वस्त मिळतील. एमएसएमईने ११ कोटी लोकांना रोजगार दिला आहे. आपल्या देशात सर्व काही तरी आपण कोळसा, कॉपर, सोने, इंधन आयात करतो. या सर्वांचे पर्याय आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला.