औरंगाबाद : मराठा समाजाला सरकारने दिलेले आरक्षण फसवे आहे. यापूर्वीच्या सरकारनेही दिलेले आरक्षण टिकले नाही आणि हे आरक्षणदेखील कोर्टात टिकण्याबाबत साशंकता आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी केली.
गजानन महाराज मंदिर येथील कडा आॅफिसच्या मैदानावर ब्रिगेडतर्फे आयोजित स्वराज्य संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ‘शहीद काकासाहेब शिंदे’ विचारमंचावर प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखारे, उपाध्यक्ष इम्तियाज पीरजादे, टिपू सुलतान यांचे वंशज मन्सूर अली शहा टिपू, प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. रामभाऊ मुरकुटे, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगर अध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा चव्हाण आदींची उपस्थिती होती.
खेडेकर म्हणाले, संभाजी ब्रिगेड या पक्षाच्या एकजुटीमुळे काही बांडगुळांना धडकी भरली आहे. पक्षबळावर येणाऱ्या लोकसभेच्या ३० आणि विधानसभेच्या १०० जागा लढविणार आहे. आरक्षण, शेतीमालाला भाव, विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन पक्ष वाटचाल करीत आहे. समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी विरोध करणारे ओबीसींचे नेते हे सरकारी पॅकेज घेऊन विरोध करीत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा विरोध नाही. दोन-चार जणांच्या विरोधामुळे हा सगळा प्रकार सुरू आहे. मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ.भानुसे, गायकवाड यांनी केले.
करून टाका औरंगाबादचे संभाजीनगरऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करून टाका ना, विरोध कुणाचा आहे ते आम्हाला सांगा. केंद्रात, राज्यात, मनपात तुमचीच सत्ता आहे. जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम असा संघर्ष निवडणुकीपुरता उभा करायचा, हा प्रकार आता तरी बंद करा. रामराज्य आणण्यासाठी अयोध्येत जाऊन काही होणार नाही. बहुजनांना सोबत घेऊन रामराज्य संभाजी ब्रिगेडच आणील. जे अयोध्येत गेले, त्यांनी आधी त्यांच्या वडिलांचे स्मारक बांधावे, असा टोलाही खेडेकर यांनी लगावला.
७० वर्षांत संविधान शिल्लक ठेवले का? मेळाव्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँगे्रस, मनसे या पक्ष नेत्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका करण्यात आली. ७० वर्षे देशावर ज्यांनी सत्ता गाजविली, त्यांनी संविधान शिल्लक ठेवले काय, असा सवाल प्रवक्ते बनबरे यांनी उपस्थित केला. ओबीसी व मराठा असा संघर्ष निर्माण करणारे आरक्षण आम्हाला मान्य नाही. आरक्षण अहवाल विधानसभेत चर्चेसाठी खुला न करणे हे संशयास्पद असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली.
टिपू सुलतान हे छत्रपतींचे फॉलोवरटिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे फॉलोवर असल्याचे दाखले त्यांचे वंशज मन्सूर अली शहा टिपू यांनी मेळाव्यात दिले. ते म्हणाले, ७० वर्षांतील सत्ताधाऱ्यांनी आम्हाला गुलाम केले आहे. मुस्लिम समाजासाठी तीन वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात आले. एकाही आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या नाहीत. एमआयएमचे नाव न घेता ते म्हणाले, त्यांनी आधी त्यांचे घर सांभाळावे, त्यानंतर मुस्लिम समाजाचे ठेकेदार व्हावे. पेशवे, ब्रिटिश आणि निजामांनी मिळून देशाचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला.