औरंगाबाद : महापालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणूक रणांगणासाठी ३ फेब्रुवारीला इतर मागासवर्ग व महिला प्रवर्गासाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत. ४ फेब्रुवारीला प्रारूप वॉर्ड रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असून, ११ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप वॉर्ड रचनेवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील, असे आयोगाने आदेशात म्हटले आहे.
महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावात सुधारणा केल्यानंतर आयोगाने आरक्षण सोडतीची तारीख कळविली आहे. ३ फेब्रुवारीला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी असलेल्या राखीव वॉर्डांची सोडत काढली जाणार आहे. ४ फेब्रुवारीला प्रारूप वॉर्ड रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्यावर ११ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. ३१ जानेवारी रोजी सोडत काढण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-२०२० मध्ये होणे संभाव्य असून, १८ डिसेंबर २०१९ रोजी बहुसदस्यीय प्रभाग पाडून सोडतीचा कार्यक्रम ठरला होता. मात्र राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने बहुसदस्यीय पद्धती रद्द करून पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धत लागू करण्याचे निर्णय घेतला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने रचना करून प्रस्ताव अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांच्या समितीकडे पाठविला. तो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. दरम्यान आयोगाकडून सोडतीबाबत पत्र न आल्याने विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुकांची धाकधूक वाढत चालली होती.
बहुतांश वॉर्डांची सीमा बदल होण्याची शक्यता महापालिकेच्या २०१५ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ११५ वॉर्ड होते. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी ११५ वॉर्डच असतील. मात्र बहुतांश वॉर्डांच्या सीमा बदलण्याची शक्यता आहे. सातारा, देवळाई भागात दोन वॉर्ड असून, लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या इतर वॉर्डात समप्रमाणात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर वॉर्डांच्या सीमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतरच वॉर्ड सीमांमधील बदल समोर येईल.