दुष्काळाचा घेणार आढावा
By Admin | Published: April 20, 2016 11:05 PM2016-04-20T23:05:16+5:302016-04-20T23:49:15+5:30
बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रा. काँ. च्या खा. सुप्रिया सुळे हे दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सुळे या गुरूवारी त
बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रा. काँ. च्या खा. सुप्रिया सुळे हे दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सुळे या गुरूवारी तर ठाकरे हे शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होत आहेत. हे दोन्ही दिग्गज सत्तेबाहेर आहेत; परंतु त्यांच्या दौऱ्यांकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
राज ठाकरे व सुप्रिया सुळे हे दोघेही सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सुळे या गुरूवारी गेवराईतील प्रकल्प जलशारदा अंतर्गत कार्यान्वित विविध जलसंधारण प्रकल्पांना भेटी देणार आहेत. दुपारी १२ वाजता धोंडराई येथे माती बंधारा व अमृता नदीच्या पुनरूज्जीवन कामाची पाहणी करतील. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी १ वा. पेंडगांव (ता. बीड) येथे बांधलेला सिमेंट बंधारा आणि नदीच्या विस्तारीकरण कामास भेट देणार आहेत. त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, रा. काँ. जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी मंत्री प्रकाश सोळंके राहतील. शुक्रवारी पाटोदा, अंबाजोगाई, केज येथे त्यांचा दौरा आहे.
राज ठाकरे शुक्रवारी दुपारी दोन वाजता अंबाजोगाईत पोहचणार आहेत. योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन ते न्यायालयातील तारखेला उपस्थित राहतील. त्यानंतर परळीत ते मुक्कामी राहणार आहेत. शनिवारी परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन ते दुष्काळी परिस्थितीत पक्षाने सुरू केलेल्या कामांची पाहणी करणार आहेत. वडवणी तालुक्यातील मोरवड, बाहेगव्हाण, पुसरा, हिवरगव्हाणमध्ये ते भेट देणार आहेत.
दुपारी ३ वाजता मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांची बैठक घेऊन ते बीडमध्ये मुक्काम करतील. रविवारी बिंदुसरा धरणाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर कपिलधार येथे दर्शन घेतील. बीड तालुक्यातील वडवाडी, बोरखेड, लोणी येथे दुष्काळी पाहणी करणार आहेत. सोमवारी न्यायालयात हजर राहून येवलवाडी (ता. पाटोदा) व त्यानंतर शिरूर कासारला दौरा आहे. नंतर गेवराई मार्गे ते जालन्याकडे रवाना होणार आहेत. (प्रतिनिधी)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चार दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असून, सलग तीन दिवस मुक्कामी राहणार आहेत. ते पहिल्यांदाच एवढे दिवस बीड मुक्कामी असणार आहेत. त्यांचा एक मुक्काम पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या परळी येथे आहे. या दौऱ्यात दुष्काळ पाहणीसोबतच राजकीय खलबते देखील होतील, अशी शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांचे मतभेद व हेवेदावे हे मुद्दे वादळी ठरणार आहेत.