'हरित' महाराष्ट्रासाठी पुढचे पाऊल; राज्यातील रिक्षा आता ‘सोलार’वर धावणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 06:05 PM2022-02-23T18:05:11+5:302022-02-23T18:05:40+5:30
महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात रिक्षाचालक, मालकांवर मोठे संकट कोसळले होते. या संकटाला तोंड देत आता त्यांचा उदरनिर्वाह पूर्ववत होत आहे. सरकारने लॉकडाऊनमध्ये ७ लाखांहून अधिक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये दिले. वाढत्या इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालक वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठे पाऊल उचलले. राज्यातील काही रिक्षा सोलार एनर्जीवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे, औरंगाबादेत काही रिक्षा सोलारमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. मात्र, भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले. त्यातच लॉकडऊनमुळे अनेक रिक्षाचालक, मालकांचे आर्थिकरीत्या कंबरडे मोडले. पोटाची खळगी कशी भागवावी, असा प्रश्नही आजही त्यांना भेडसावतोय. रिक्षाचालकांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे ही कल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १०७ कोटी रुपये जमाही करण्यात आले.
पेट्रोल-डिझेलवरील रिक्षा आता परवडत नाहीत. दिवसभर मेहनत करूनही १०० ते २०० रुपयेही शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे सरकारने राज्यातील काही रिक्षा सोलारवर चालविण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी येणारा खर्च राज्य शासन काही प्रमाणात उचलणार आहे. रिक्षाचालकांना काही भार उचलावा लागेल. त्यातही सबसिडी दिली जाईल. कायमस्वरूपी रिक्षा सोलारवर धावणार आहे. हवेचे प्रदूषण कमी करण्यातही मोठा हातभार लागेल, असे शासनाला वाटत आहे.
औरंगाबाद, पुण्याची निवड
औरंगाबाद शहरात साधारणपणे १३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा रेकॉर्डवर आहेत. त्यातील किमान ५ हजार रिक्षा सोलारवर चालविण्याचा मानस आहे. पुणे शहरात रिक्षांची संख्या ८७ हजारांहून अधिक आहे. त्यातील १४ हजारांहून अधिक रिक्षा सोलारवर करण्यात येतील. हा पायलट प्रोजेक्ट आहे. सध्या पेट्रोल-डिझेलवर जेवढे प्रवासी नेता येतात तेवढेच प्रवासी सोलारवरही नेता येतील. रिक्षाची वहन क्षमता कमी होणार नाही.
- आस्तिककुमार पाण्डेय, सीईओ स्मार्ट सिटी, औरंगाबाद.