समृद्धीच्या मोबदल्यापोटी आत्मदहनासाठी रॉकेलची कॅन आणली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:05 AM2018-12-27T00:05:36+5:302018-12-27T00:06:12+5:30
समृद्धी महामार्गात जळगाव फेरण येथील एका कुटुंबाची जमीन गेली. मोबदला मिळण्याची वेळ येताच विभक्त राहणाऱ्या सूनबाईने आपला वाटा मागून आडकाठी आणली. जिल्हा प्रशासनानेही आक्षेप येताच मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. त्यामुळे शेतकरी कुटुंब बुधवारी दुपारी एसडीएम कार्यालयात चक्क रॉकेलची कॅन घेऊन दाखल झाले.
औरंगाबाद : समृद्धी महामार्गात जळगाव फेरण येथील एका कुटुंबाची जमीन गेली. मोबदला मिळण्याची वेळ येताच विभक्त राहणाऱ्या सूनबाईने आपला वाटा मागून आडकाठी आणली. जिल्हा प्रशासनानेही आक्षेप येताच मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. त्यामुळे शेतकरी कुटुंब बुधवारी दुपारी एसडीएम कार्यालयात चक्क रॉकेलची कॅन घेऊन दाखल झाले. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. आठवडाभरात पैसे खात्यावर जमा होतील, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यावर कुटुंबीय निघून गेले.
जळगाव फेरण येथील गट नंबर २२४ मध्ये सुलाबाई भाऊसाहेब शेंडे यांची १.०५ आर जमीन आहे. यापैकी ०.९७ आर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित झाली आहे. त्यांना २ कोटी ३१ लाख रुपये मोबदला मिळणार आहे. १० डिसेंबर २०१८ रोजी त्याची रीतसर रजिस्ट्रीही झाली. मात्र मोबदल्याची रक्कम खात्यावर काही जमा झाली नाही. पंधरा दिवस उलटले तरी अधिकारी पैसे काही देईनात. जागेचा मोबदला येणार असल्याने बँकेच्या कर्जफेडीसाठी तडजोड करून २ लाख ७० हजार रुपये २६ डिसेंबरपर्यंत भरावे लागणार आहेत. ही रक्कम वेळेवर न भरल्यास व्याजासह ७ लाख ३६ हजार १२० रुपये भरण्याची वेळ शेंडे कुटुंबियांवर येणार आहे. आमचे पैसे त्वरित जमा करावे, अशी मागणी करून आत्मदहनाचा इशारा सुलाबाई शेंडे यांनी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिला होता. दरम्यान, शेंडे कुटुंबियांना मोबदला मिळू नये म्हणून विभक्त राहणारी सून ललिता परमेश्वर शेंडे हिने जिल्हा प्रशासनाकडे आक्षेप दाखल केला. त्यामुळे अधिकाºयांनी मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. बुधवारी दुपारी शेंडे कुटुंबीय रॉकेलची कॅन घेऊन कार्यालयात दाखल झाल्याने अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच पंचाईत झाली.
पत्नीला वाटा देणार
माझी पत्नी वेगळी राहत असून, आम्ही तिच्या वाट्याचे ३६ लाख रुपये देण्यास तयार आहोत. अधिकाºयांनी ही रक्कम बाजूला करून उर्वरित रक्कम आमच्या खात्यावर जमा करावी, अशी विनंती केली. मात्र अधिकारी तेही करीत नसल्यानेच आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर आल्याचे परमेश्वर शेंडे यांनी सांगितले.
काय म्हणाले तहसीलदार
तहसीलदार सतीश सोनी यांनी सांगितले की, सुलाबाई यांची सून ललिता परमेश्वर शेंडे यांनी आक्षेप अर्ज दाखल केलेला आहे. सध्या सून विभक्त राहते. तिला दीड वर्षाची एक मुलगीही आहे. तिच्या हिश्श्याचा शेअर बाजूला काढून उर्वरित रक्कम देता येईल. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतला व सुनेकडून संमतीपत्र आणून जमा केले. मात्र त्यावरील सही माझी नसल्याची तक्रार ललिता यांनी केल्याने मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली.