रोहित्राचा स्फोट, कपाशी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:37 PM2020-09-25T17:37:49+5:302020-09-25T17:38:34+5:30
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे गुरूवार दि. २४ रोजी एका रोहित्राचा स्फोट झाला. यात आग लागून शेतकरी चंद्रकांत बर्डे यांची अर्ध्या एकरमधील कपाशी जळून खाक झाली.
गल्ले बोरगाव : खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे गुरूवार दि. २४ रोजी एका रोहित्राचा स्फोट झाला. यात आग लागून शेतकरी चंद्रकांत बर्डे यांची अर्ध्या एकरमधील कपाशी जळून खाक झाली. यात सदर शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले.
पळसवाडी शिवारातील गट नं. ४६० मध्ये शेतकरी चंद्रकांत बर्डे यांनी पाच एकर कपाशी लावली आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी कपाशीवर हजारो रूपये खर्च केले. हालाखीच्या परिस्थितीतही कपाशी जोपासली. मात्र त्यांच्या शेतात असलेल्या महावितरणच्या रोहित्राचा अचानक स्फोट झाला. यात बर्डे यांच्या कपाशीला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच बर्डे यांनी ग्रामस्थांसह शेताकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत अर्धा एकर कपाशी जळून खाक झाली होती. या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. बर्डे यांच्या शेतातील याच रोहित्राचा मागील वर्षीही स्फोट झाला होता. यामध्ये त्यांचे गहूचे पीक जळाले होते.