औरंगाबाद : यंदा उत्पादन घटल्याने मराठवाडी मोसंबीला भाव चढला आहे. बाजारात प्रतिकिलो ८० रुपयांपासून ते १५० रुपयांदरम्यान मोसंबीची विक्री होत आहे.
मागील वर्षी लॉकडाऊन काळात २० ते ४० रुपये किलोने विकली गेलेली मोसंबी सध्या काही मोजक्याच फळ विक्रेत्यांकडे मिळत आहे. कारण, मोसंबीचे उत्पादन ८० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. यासंदर्भात मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, देशात औरंगाबाद-जालना जिल्हा मोसंबी उत्पादनात गड मानला जातो. सर्वाधिक मोसंबीचे उत्पादन याच जिल्ह्यात होते. मोसंबीचे आंबे आणि मृग असे दोन बहर आहेत. सध्या आंबे बहरची मोसंबी बाजारात येत आहे. मात्र, ८० टक्के झाडावर फळधारणा झालीच नाही. २० टक्के झाडांवरील मोसंबी बाजारात येत आहे. कोरोनामुळे मोसंबी रसाला मागणी खूप आहे. जिल्ह्यातूृन सध्या मुंबई, दिल्ली, गुजरात राज्यात मोसंबी जात आहे.
पाचोड येथील अडत व्यापाऱ्यांनी सांगितले की, येथे विक्रीसाठी मोसंबी शिल्लक नाही. दोन आठवड्यांपूर्वी मोसंबीला विक्रमी १ लाख १० हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला होता. त्यांनी सांगितले की, मृग बहरातील मोसंबीला ज्यूस विक्रेत्यांकडून, तर आंबे बहरातील मोसंबीला घरगुती ग्राहकांकडून मागणी असते.
चौकट
बारीक फळ
सध्या बाजारात हलक्या प्रतीची व आकाराने बारीक असलेली व रसाचा अभाव असलेली मोसंबी विकली जात आहे. या मोसंबीला ८० रुपये किलो भाव मिळत आहे, तर आकाराने मोठी व रसदार मोसंबी १५० रुपये किलो दराने विकली जात आहे; पण या किमतीतही मोसंबी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.