बस वाहतुकीअभावी प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:36 AM2017-10-18T00:36:35+5:302017-10-18T00:36:35+5:30
जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, परतूर, अंबड आगारातील सर्व बसेस बंद राहिल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची मोठी गैरसोय झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळ कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेल्या संपास मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, परतूर, अंबड आगारातील सर्व बसेस बंद राहिल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. जिल्ह्यातील मध्यरात्री बारा वाजेपासून जालना शहरासह परतूर, अंबड, जाफराबाद आगारातील सर्व २७७ बसेस बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी सकाळपर्यंत बसस्थानकातच अडकले. सकाळी मिळेल त्या खाजगी वाहनांचा आधार घेत घरी पोहोचण्यासाठी प्रवाशांची धावपळ झाली.
दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणा-या जालना आगारातील सर्व ३९० वाहक-चालक संपावर गेल्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघाली नाही. जालना आगाराला एका दिवसात सुमारे आठ लाखांचे उत्पादन मिळते.
संपामुळे हे उत्पन्न बुडाले. दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी बसस्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. सुरुवातीला बसस्थानकात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र, बस वाहतूक सुरु होणार नाही याची खात्री पटल्यानंतर प्रवाशांनी आपला मोर्चा खाजगी वाहनांकडे वळविला. तर काही जण आल्या पावली मागे परतले. त्यामुळे बसस्थानकात दुपारी शुकशुकाट दिसून आला.
खाजगी वाहनधारकांनी संधी साधत मनमानी भाडे वसूल करण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी रेल्वेस्थानक गाठले. जालना-भोकरदन, जालना-देऊळगाव राजा, जालना-अंबड, मंठा, परतूर, जालना-औरंगाबाद या रस्त्यावर दिवसभर ट्रॅक्स, रिक्षा, मिनीडोअर , छोटा हत्ती ही वाहने धावताना दिसली.
जालना आगाराच्या ७७ बसेसच्या सुमारे अडीचशे फेºया, जाफराबाद आगाराच्या ६० बसच्या २५७ फे-या, परतूर आगाराच्या ३५ बसेसच्या १६५ फेºया रद्द झाल्या. अंबड बसस्थानकातही प्रवाशांची गैरसोय झाली. चारही आगार मिळून एका दिवसात सुमारे ५७ हजार किलोमीटर प्रवास करणा-या सर्व बसेस बंद राहिल्यामुळे एसटी आगाराचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा फायदा खाजगी वाहतूकदारांनी घेतला.