लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर शासकीय सेवेत असताना खाजगी प्रॅक्टिसकडेच अधिक लक्ष देतात़ वारंवार ही बाब उघडकीस आली आहे़, परंतु प्रशासनाकडूनही जाणीवपूर्वक त्यांच्याकडे कानाडोळा करण्यात येतो़ नुकतेच नागपूर येथील खाजगी प्रॅक्टिस करणाºया पंधरा डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे़, परंतु नांदेडचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़विष्णूपुरी येथे अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे़ या ठिकाणी नांदेडसह यवतमाळ, पुसद, हिंगोली, परभणी, शेजारील आंध्र प्रदेशातून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात़ त्यामुळे या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी संचालक कार्यालय पुरेपूर खबरदारी घेते़, परंतु या ठिकाणचे तज्ज्ञ डॉक्टर मात्र शासकीय वेतन घेत असूनही खाजगी प्रॅक्टीसलाच अधिक महत्त्व देतात़ व्यवसायरोध भत्ता घेता किंवा न घेता या डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिस सुरुच आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून बिनभोबाटपणे हा प्रकार सुरु आहे़ त्यामुळे रुग्णालयात येणाºया गरीब रुग्णांची गैरसोय होते़ अनेक महाभाग तर शासकीयमध्ये विशिष्ट आजाराचा उपचार होत नसल्याचे कारण दाखवून रुग्णांना आपल्याच खाजगी रुग्णालयात दाखल होण्यास सांगतात़एखादी शस्त्रक्रिया शासकीयमध्ये होत नसल्याचे सांगून आपल्याच खाजगी रुग्णालयात ती करण्यात आल्याचे अनेक प्रकारही यापूर्वी घडले आहेत़, परंतु त्यांच्यावर कारवाईसाठी मात्र कुणीही पुढे आले नाही़ डॉक्टरांच्या लेटलतीफ प्रकारावर आळा बसावा म्हणून बायोमेट्रीक मशीन बसविली आहे़ त्याची तपासणी केल्यास अनेक झारीतील शुक्राचार्य उघडे पडतील़ नागपूर येथे अशाप्रकारे खाजगी प्रॅक्टीस करणाºया मेयोच्या सात आणि मेडिकलच्या आठ अशा पंधरा डॉक्टरांवर डीएमईआरने कारवाई केली आहे़, परंतु नांदेडातील डॉक्टरांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शासकीय डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:35 AM