छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सांस्कृतिक विकास मंडळावरची विशाल जाहीर सभा आणि शिवसेना हे जणू समीकरणच बनलेले. रविवारची सभा भलेही महाविकास आघाडीच्या नावावर झाली असेल; पण या सभेवर वर्चस्व राहिले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे.
मराठवाडाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांमध्येही शिवसेनेचेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्या गळ्यात भगवे गमछे होते. मंचावर मध्यभागी असलेली वेगळी खुर्ची उद्धव ठाकरे यांच्यासाठी होती. उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले, तेव्हा शिवसेनेच्या पद्धतीनेच स्वागत करण्यात आले. उद्धव आले, तेव्हा अशोकराव चव्हाण यांचे भाषण सुरू होते. ठाकरे आल्या आल्या ‘कोण आला रे कोण आला’ ही घोषणा निनादली. फटाक्यांची आतषबाजी झाली. समोर येऊन लवून त्यांनी उपस्थितांना नमस्कार केला. या सभेत एक झाले की, कोणाचाच कोणी पुष्पहार देऊन सत्कार केला नाही.
आजच्या सभेला काँग्रेसचे कार्यकर्ते किती हा संशोधनाचाच विषय ठरावा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, पण फार मोठ्या संख्येने नव्हते. व्यासपीठाचा ताबाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आदींनी घेेऊन ठेवला होता. सूत्रसंचालन दानवे यांनी केले. आभार न मानताच राष्ट्रगीत सुरू झाले. नाही तर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांपैकी एखाद्याला ते काम देता आले असते.
१९८८ साली बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा याच मैदानावर झाली होती. त्या काळात खुर्च्या ठेवत नसत. रविवारच्या या सभेत आसनव्यवस्था चांगली होती. बाबा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी आठशे गाड्या अडवून ठेवल्या आहेत, असा खळबळजनक दावा करीत अंबादास दानवे यांनी पोलिसांना थेटच इशारा दिला की, ‘उद्या आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पाहून घेऊ’.