'वडापाव खाण्यासाठी तसे बोललो'; रिक्षात छेडछाड प्रकरणातील आरोपीचा दावा, १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 07:29 PM2021-08-30T19:29:01+5:302021-08-30T19:31:01+5:30
रिक्षाचालकाने तुला दुसरीकडेच घेऊन जातो, असे म्हटल्याने घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली होती.
औरंगाबाद : मोंढा नाका चौकातून शिकवणी वर्गाला जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणात आरोपी आनंद पहुलकर याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. यात पोलिसांना चौकशीसाठी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मोंढा नाका चौकातून रिक्षामध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलीने चालकास रामगिरी हॉटेलजवळ सोडण्यास सांगितले. तेव्हा रिक्षाचालकाने तुला दुसरीकडेच घेऊन जातो, असे म्हटल्याने घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेची माहिती समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद पोलिसांनी रिक्षाचालक आरोपीला ८ तासांच्या आत अटक केली. या आरोपीला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने चौकशीसाठी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत, आरोपीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा निर्णय दिला. यानुसार, आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी झाली.
वडापाव खाण्यासाठी तसे बोललो
पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, तिला रामगिरीजवळ सोडणार नाही, मी तुला दुसरीकडे घेऊन जातो. त्यानंतर, रामगिरीजवळ सोडतो, असे बोलले होतो. वडापाव खायचा असल्यामुळे असे बोलल्याचा दावा आरोपीने केला. या आरोपीची पीडितेकडून कारागृहातच ओळख परेड करण्यात येणार असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.