यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार
By विकास राऊत | Published: March 7, 2024 01:23 PM2024-03-07T13:23:40+5:302024-03-07T13:25:34+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६,५३२ दिव्यांग, ४५,०५३ वयोवृद्ध मतदार
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने तयार केलेले ‘सक्षम’ नावाचे मोबाइल ॲप दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना (८५ वर्षे व त्यापेक्षा अधिक) मतदान करण्यासाठी साहाय्य करणार आहे.
दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना सक्षमॲपद्वारे मतदानासाठी लागणाऱ्या साहाय्याची मागणी नोंदवावी लागेल. त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांचे मतदारसंघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. त्यानुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहायक इ. पोहोचविण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणा करील. मतदारसंघनिहाय दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त हे मूल्यमापन करणार आहेत. १९५० हेल्पलाइन व व्हिडीओ कॉल सुविधा असेल.
जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत, तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कन्नड, मध्य, पश्चिम, पूर्व, गंगापूर, वैजापूर हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. संपूर्ण जिल्ह्यात १६ हजार ६० पुरुष, तर १० हजार ४६० महिला व १२ इतर असे एकूण २६,५३२ दिव्यांग मतदार आहेत. जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या विधानसभा मतदार संघांतील दिव्यांग मतदारसंख्या ९,५३२ तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारसंख्या १७ हजार आहे. ८५ पेक्षा अधिक असलेले वयोवृद्ध मतदार संख्या जिल्ह्यात १८ हजार १५६ पुरुष, २६ हजार ८९७ महिला अशी एकूण ४५ हजार ५३ इतकी आहे. त्यात जालना लोकसभा मतदारसंघात १६ हजार १२२, तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात २८ हजार ९३१ मतदार वयोवृद्ध आहेत.