औरंगाबाद : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गातीलऔरंगाबाद जिल्ह्यांतर्गत ११० कि.मी.चा पट्टा असून नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर एसएसआरडीसीच्या यंत्रणेने गुरुवारी आढावा बैठकीत केला.
पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग २११, समृद्धी महामार्ग व इतर रस्ते योजनांचा आढावा घेत जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामासाठी संबंधित यंत्रणांनी सोपविलेली कामे डेडलाईनमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिले. १ मे २०२१ रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित असल्याचे एमएसआरडीसीचे अभियंता साळुंखे यांनी सांगितले.
रस्ते दुरुस्तीच्या कामांत प्राधान्य द्या. वैजापूर-औरंगाबाद रस्ता दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया या यंत्रणांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करून दुरुस्ती सुरू करावी. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती मुदतीत कामे पूर्ण करावी. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, उपअभियंता व्ही. एन. चामले, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर उपस्थित होते.
समृद्धीची पाहणी करणारडिसेंबर महिन्यात पालकमंत्री देसाई समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. जिल्ह्यात महामार्गाची लांबी ११२ किलोमीटर आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा प्रस्तावित आहे.
एनएच-२११ चे काम फक्त ७ कि.मी.जिल्ह्यातून १२१ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यापैकी ७ कि.मी. काम पूर्ण झाले असून करोडी ते औरंगाबाद आणि करोडी ते तेलवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच वैजापूर रस्ते दुरुस्ती कामांची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले.