मराठवाड्याचे पाणी ठाण्याकडे वळविण्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:27 AM2018-05-24T00:27:21+5:302018-05-24T00:27:32+5:30
याचा परिणाम या दोन्ही तालुक्यांतील १२ हजार हेक्टरच्या सिंचनावर होणार आहे.
औरंगाबाद : ठाणे जिल्ह्यातील भावली प्रकल्पातील गंगापूर, वैजापूर तालुक्याच्या वाट्याचे सुमारे २५ ते ३० टक्के पाणी शहापूर तालुक्यातील ९७ गावांसाठी वळविण्याचा निर्णय झाला आहे. याचा परिणाम या दोन्ही तालुक्यांतील १२ हजार हेक्टरच्या सिंचनावर होणार आहे.
गोदावरी खोऱ्यातील नाशिक, अहमदनगर, मराठवाड्यात जायकवाडीच्या पाण्यावरून वाद आहे. या पट्ट्याच्या पश्चिम भागातील पाणी समुद्राला जाऊन मिळते, ते पाणी गोदावरी पात्राकडे वळविण्याऐवजी जास्त पाऊस पडतो, तिकडेच वळवून नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राचे नुकसान करण्यात आले आहे.वैजापूर, गंगापूर तालुक्यातील ४३ हजार हेक्टरला भावलीतून पाणी मिळते. ३० टक्के पाणी कपातीमुळे सुमारे १२ हजार हेक्टर सिंचन कशावर करायचे, याचा विचार झालेला नाही. जलतज्ज्ञ तथा मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे यासंदर्भात एमडब्ल्यूआरआरएकडे (महाराष्ट्र वॉटर रेग्युलेटरी रिसोर्स अॅथॉरिटी) याचिका दाखल करणार आहेत.