'आमची लढत एमआयएम सोबत'; खैरे यांना प्रतिस्पर्धी मानत नसल्याचा संजय शिरसाट यांचा दावा
By बापू सोळुंके | Published: April 4, 2024 08:00 PM2024-04-04T20:00:24+5:302024-04-08T18:58:04+5:30
यवतमाळ आणि हिंगोलीचे उमेदवार उमेदवार बदलण्याचा निर्णय केवळ निवडणुक जिंकणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उबाठा गटाचे चंद्रकांत खैरे यांना आम्ही प्रतिस्पर्धी मानतच नाही, येथे आमची लढत एमआयएम सोबत होईल, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
आ. शिरसाट म्हणाले की, लवकरच औरंगाबाच्या उमेदवाराची घोषणा होईल. आणि आम्ही खैरे यांना आमचा प्रतिस्पर्धी मानतच नाही. आमची लढत एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यासोबत होईल. शिवसेनेने उमेदवार बदलल्यामुळे विरोधकांकडून टीका होत असल्याकडे लक्ष वेधले असता आ. शिरसाट म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ आणि हिंगोलीचे उमेदवार उमेदवार बदलण्याचा निर्णय केवळ निवडणुक जिंकणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. खा.भावना गवळी, हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारली असली तरी मुख्यमंत्री त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आ.शिरसाट म्हणाले.
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे हे स्वत:ला ठाण्याचा वाघ म्हणतात, पण ती स्वत:कडे ठेवू शकले नाही, अशी टीका केली. मुख्यमंत्री स्वत:च्या मुलाची उमेदवारी ते घोषित करू शकत नसल्याच्या राऊत यांच्या आरोपावर बोलताना आ. शिरसाट म्हणाले. खा. श्रीकांत शिंदे हे केवळ मुख्यमंत्र्याचे पुत्र आहे एवढेच नव्हे तर त्यांचे ठाणे, कल्याण मतदार संघात अफाट काम आहे. कोणताही निर्णय गडबडीत घ्यायचा नाही. कारण अजून तेथील निवडणूकांना वेळ आहे. उमेदवारी कधी जाहीर करायची याबाबत मुख्यमंत्र्यांचा धोरणात्मक विचार आहे. राऊत यांनी कधी लोकसभेची निवडणूक लढविली का, त्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही, लोक त्यांचा चेहरा पाहुन कंटाळल्याचा आराेपही शिरसाट यांनी केला.