सरपंचांनो, प्रशिक्षणाला दांडी माराल तर आता कारवाईचा दणका !
By विजय सरवदे | Published: December 22, 2023 11:15 AM2023-12-22T11:15:59+5:302023-12-22T11:20:01+5:30
अनुपस्थितीबाबत नाराजी : गैरहजर सरपंचांना १० हजार रुपयांचा दंड
छत्रपती संभाजीनगर : नवनियुक्त सरपंचांची क्षमता बांधणी करण्याच्या उद्देशाने त्यांना राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानांतर्गत पायाभूत प्रशिक्षण व त्यानंतर उजळणी प्रशिक्षण दिले जाते. यासंदर्भात, जिल्हा परिषदेमार्फत सातत्याने पत्रव्यवहार करून देखील बहुतांश सरपंच प्रशिक्षणाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. तथापि, गैरहजर राहाणाऱ्या सरपंचांविरुद्ध जिल्हा परिषदेने आता कारवाईचा बडगा उचलला असून प्रशिक्षणावर होणारा किमान १० हजार रुपयांचा खर्च गैरहजर सरपंचांकडून वसूल केला जाणार आहे.
यासंदर्भात, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार निवडून आलेल्या सरपंचांचे ६ महिन्यांच्या आत ४ दिवसांचे निवासी पायाभूत प्रशिक्षण व त्यानंतर दोन वर्षांनी उजळणी प्रशिक्षण घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील चालू आर्थिक वर्षात २४२ सरपंचांचे पायाभूत प्रशिक्षण आणि २९१ जणांचे उजळणी प्रशिक्षण अपेक्षित आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत १४ ते १७ डिसेंबर, १९ ते २२ डिसेंबर, २७ ते ३० डिसेंबर या तीन टप्प्यांत महसूल प्रबोधिनी सभागृहात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय सरपंच किती?
तालुका- सरपंच
छत्रपती संभाजीनगर ११२फुलंब्री ६९
सिल्लोड १०२
सोयगाव ४६
कन्नड १३१
खुलताबाद ३९
गंगापूर ११०
वैजापूर १३०
पैठण १०५
सरपंचांना कोणकोणते प्रशिक्षण दिले जाते?
सरपंचांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाची ओळख, अधिनियमातील तरतुदी, जबाबदारी, कर्तव्य, वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग, विकास आराखडा तयार करणे, शासनाच्या विविध विकास योजना राबविणे आदी संदर्भात प्रशिक्षणे दिली जातात.
प्रशिक्षणाला काय असते उपस्थिती?
बहुतांश महिला सरपंचांना निवासी प्रशिक्षणासाठी कुटुंबांकडून प्रोत्साहन दिले जात नाही. त्यामुळे महिला सरपंचांची अशा प्रशिक्षणाला फारसी उपस्थिती राहात नाही. याशिवाय पुरुष सरपंच देखील प्रशिक्षणाला दांडी मारत असल्याचे आढळून येत असल्याबद्दल ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे जि.प. मुख्य कार्य कारी अधिकाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईचा निर्णय घेणे भाग पडले आहे.
दांडी मारणाऱ्या सरपंचांवर होणार कारवाई
प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या सरपंचांवर आता जिल्हा परिषदेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर किमान १० हजार रुपये एवढा प्रशिक्षणावर होणारा चार दिवसांचा खर्च वसूल करण्यात येणार आहे.
केवळ खर्च करायचा म्हणून प्रशिक्षणे
सरपंचांचे प्रशिक्षण झालेच पाहिजे. पण, ग्रामपंचायतीचा उत्कृष्ट कारभार करणाऱ्या अनुभवी सरपंचांकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. ज्यामुळे प्रशिक्षणार्थी अशा सरपंचाची प्रेरणा घेतील. केवळ खर्च करायचा म्हणून प्रशिक्षणे आयोजित करण्यास संघटनेचा विरोध आहे.
- आजिनाथ धामणे, संस्थापक अध्यक्ष, ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन