काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्तार यांची अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:14 PM2019-04-04T23:14:19+5:302019-04-04T23:15:05+5:30

ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही.

Sattar's discomfort due to Congress getting no response | काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्तार यांची अस्वस्थता

काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सत्तार यांची अस्वस्थता

googlenewsNext

औरंगाबाद : सुभाष झांबड यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यापासून आ. अब्दुल सत्तार यांची वाढलेली अस्वस्थता सतत वाढतच आहे. ना स्थानिक, ना राज्य वा दिल्ली पातळीवरून काँग्रेसकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारची कोंडी होऊन अस्वस्थता वाढत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तार यांना चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नसल्याने, तर ही अस्वस्थता आणखीच वाढली आहे.काँग्रेसचा तुम्ही राजीनामा दिला; पण तो स्वीकारला कुठे, असे विचारता, सत्तार म्हणाले की, हा त्यांचा प्रश्न आहे. नाही तर त्यांनी माझी हकालपट्टी करावी.

देवेंद्र फडणवीस एक चांगला माणूस आहे. आम्हाला भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे; पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाही, असा टोला सत्तार यांनी लगावला. सत्तार यांची बंडखोरी स्थानिक वा जिल्हा पातळीवरही कुणी गांभीर्याने घेतली नाही. कोणत्याही छोट्या-मोठ्या पुढाऱ्याने सत्तार यांची मनधरणी केली नाही. अशोक चव्हाण यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद नाही आणि दिल्लीतूनही काहीच प्रतिसाद नसल्याने अस्वस्थतेत भर पडत गेली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी मुंबईत जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची रात्री भेट घेतली.

आ. सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच दि.२३ मार्च रोजी सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकवले. सकाळीच इकडे झांबड यांच्यावर तिकीट मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असताना तिकडे सत्तार यांनी मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर रातोरात मुंबई गाठून वर्षा बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

२९ मार्च रोजी आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा मेळावा भरवून आ. सत्तार यांनी दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही काँग्रेसकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. उलट या मेळाव्यात सत्तार समर्थकांनी तुम्ही, लोकसभा लढवा; पण काँग्रेसकडून... अपक्ष नको, असा कौल दिला असतानाही काल सत्तार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा आपल्याच समर्थकांचा त्यांनी केलेला अपमान होय, असा अर्थ काढला जात आहे.

आता भाजपमध्ये जाणार नाही व काँग्रेसचाही प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. मग अपक्ष म्हणून भरलेला अर्ज ते मागे घेतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ८ एप्रिलपर्यंत आणखी काय काय घटना घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Sattar's discomfort due to Congress getting no response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.