औरंगाबाद: राज्यातील सर्वात मोठा जैवविविधता प्रकल्प म्हणून ऐतिहासिक हिमायत बाग घोषित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या पत्ल्विअर सुरु असताना येथे मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिमायत बागेच्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरु आहे. न्यायालयाने येथील जैवविविधतेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने वारसास्थळ घोषित आदेश दिलेले असतानाही बागेतील अनेक दुर्मिळ वृक्षांची कत्तल सुरु असल्याने पर्यावरण प्रेमींनी रोष व्यक्त केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अंब्रेला वेलफेअर फाउंडेशनतर्फे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने हिमायतबाग जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. परभणी कृषी विद्यापीठाने यासंदर्भात महापालिकेकडे रीतसर प्रस्तावही दाखल केला असून यावर पालिकेची बैठकही पार पडली आहे. दरम्यान, एकीकडे जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे हिमायेतबागेत अनधिकृतरित्या वृक्षतोड सुरु आहे. काही दिवसांपासून येथे झाडांची कत्तल सुरु आहे. अनेक वृक्ष मुळासकट तोडली असून काहींच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. याबाबत महापालिकेने हिमायतबाग प्रशासकांना नोटीस बजावली आहे. अनधिकृतरित्या वृक्षतोड केल्याचा खुलासा मागविण्यात आला आहे. दरम्यान, हा न्यायालयीन आदेशाचा अवमान आहे, या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. जैवविविधता प्रकल्प सोडा आधी येथील दुर्मिळ वृक्ष तरी वाचवा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींना केली आहे.
राज्यातील पहिला मोठा प्रकल्प ऐतिहासिक हिमायत बागेत मागील अनेक दशकांपासून परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत फळ संशोधन केंद्र चालविण्यात येत होते. आता तब्बल ३०० एकरहून अधिक मोठा परिसर जैवविविधता प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे. पुण्यात ३४ एकर जागेवर अशा पद्धतीचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिमायतबागला वारसा स्थळ घोषित केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, पर्यटनाच्या दृष्टीनेही बराच फायदा होईल. मोठी वनसंपदाहिमायबागेत मोठी वनसंपदा आहे. साधारण ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची झाडे या ठिकाणी आहेत. १२० प्रकारचे प्राणी, पक्ष्यांचा या ठिकाणी वावर आहे. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर हिमायतबाग वाचावा, अशी मागणी करीत होते.