अघोरी विद्येसाठी सायळची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:06 PM2020-10-07T14:06:03+5:302020-10-07T14:06:12+5:30
अजिंठ्याच्या डोंगररांगेत अघोरी विद्येसाठी दुर्मिळ व संरक्षित असलेल्या सायळ प्राण्याची हत्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : अजिंठ्याच्या डोंगररांगेत विविध वन्य प्राणी मुक्तपणे संचार करतात. त्यातच कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यटन बंद असल्याने सध्या वन्यजीवांचा परिसरात मुक्तसंचार आहे. मात्र अघोरी विद्येसाठी दुर्मिळ व संरक्षित असलेल्या सायळ प्राण्याची हत्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सायळचे मास रूचकर असल्याने काही जण त्याची मागणी करून त्याचे काटे अघोरी विद्येसाठी मांत्रिकांना विकत असल्याची चर्चा आहे. साधारण पाच ते वीस हजारांपर्यंत एक सायाळ विक्री होते. अजिंठा डोंगररांगेत पाच वर्षांपुर्वी बिबटे, अस्वल, नीलगायसह हरिण, ससे, मोर, घोरपड अशा विविध वन्य प्राण्यांची शिकार होत होती. अजिंठा वन विभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याने शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु पुन्हा तांत्रिक विद्या जाणणारे सायळच्या मागे लागले असल्याचे दिसून आले आहे.
सायाळ तथा साळिंदर हा प्राणी हिस्ट्रीसीडी म्हणजे कृतक गणातील असून त्याचे शास्त्रीय नाव हिस्तेरिक्स इंडिका आहे. डोंगर, खडकांच्या कपारीत राहणारा हा शाकाहारी प्राणी असून झाडांचे खोड, साल, गवत, फळे, झुडूप आदी खाऊन सायाळ जगतो. सायाळ हा प्राणी दुर्मिळ असून शेड्यूल ४ अंतर्गत संरक्षित करण्यात आला आहे. १९७२ च्या वन्यजीव अधिनियम ९, ४९, ४८ अ, नुसार त्याची हत्या करणाऱ्यांना ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र बहुतांश नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने ते सायाळच्या जिवावर उठलेले आहेत, असे अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.