पाडापाडीमुळे लेबर काॅलनी परिसरात उद्या कलम १४४ लागू, वाहतूक मार्गातही बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 06:32 PM2022-05-10T18:32:09+5:302022-05-10T18:33:44+5:30
प्रत्यक्ष मोहिमेत भाग घेणाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य नागरिकांना लेबर कॉलनी परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
औरंगाबाद : विश्वासनगर, लेबर कॉलनी येथे शासकीय निवासस्थानाची निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. त्या काळात लेबर कॉलनीच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी लागू केले आहे.तसेच या परिसरातील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे.
या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन व्यक्तींच्या जीवितास इजा होऊ नये यासाठी उद्या, बुधवारी सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत लेबर कॉलनीतील रहिवासी व निष्कासन मोहिमेत सहभागी असणारे अधिकारी व अंमलदार, कर्मचारी तसेच प्रत्यक्ष मोहिमेत भाग घेणारे मजूर यांच्या व्यतिरिक्त अन्य नागरिकांना लेबर कॉलनी परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पाडापाडीमुळे वाहतूक मार्गात असतील बदल
लेबर काॅलनी येथील शासकीय निवासी इमारती जीर्ण झाल्याने त्या पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असल्याने त्यामुळे हा मार्ग उद्या, बुधवारी सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. बंदोबस्तातील अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांस ही अधिसूचना लागू नसेल, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी कळवले आहे.
सदनिका धारकांची लेबर कॉलनीत आज शेवटची सायंकाळ; उद्या पहाटेपासून सुरु होणार पाडापाडी
हे मार्ग बंद
दिल्ली गेटमार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा व येणारा मार्ग मिलकाॅर्नरपर्यंत एसटी बस वाहतुकीसाठी बंद राहील. उद्धवराव पाटील चौक ते सिटी क्लब चौकाकडे जाणारा-येणारा मार्ग सर्व वाहतुकीसाठी, विभागीय आयुक्त निवास ते चांदणे चौक दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद राहतील. चांदणे चौक ते चेलीपुरा, मंजूरपुरा ते हर्षनगर, कामाक्षी लाॅज ते चेलीपुरा, किले अर्क ते कामाक्षी लाॅज हे रस्ते बंद राहतील.
हे पर्यायी मार्ग
दिल्लीगेट ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारी - येणारी वाहने, महामंडळाच्या बसेस जळगाव रस्त्याने सिडको बसस्थानकाकडून ये-जा करतील. उद्धवराव पाटील चौक-सत्यविष्णू हाॅस्पिटल-एन-१२ ते टीव्ही सेंटरमार्गे पुढे जातील. भडकल गेट तसेच टाऊन हाॅलकडील वाहने मनपा -जुना बाजार, सिटी चौक पोलीस ठाण्यासमोरून पुढे जातील. पंचायत समिती कार्यालयासमोरून चंपा चौक मार्गे पुढे जातील.
पाडापाडीसाठी ही यंत्रणा
अधिकारी-९५
मनुष्यबळ- ४००
जेसीबी-१२
पोकलेन-५
रुग्णवाहिका-८
डॉक्टर-४