गजानन बारवाल यांना स्वगृही आणण्याचे सेनेचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:17 PM2018-04-13T17:17:24+5:302018-04-13T17:20:12+5:30
शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले.
औरंगाबाद : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून गजानन बारवाल २०१४ मध्ये पदमपुरा येथून नगरसेवकपदाची अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते स्थायी समितीचे सभापतीही आहेत. त्यांना परत एकदा सेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. १९ एप्रिल रोजी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे शहरात दाखल होत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारवाल यांना सेनेत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सेनेत ठराविक नेत्यांचीच दादागिरी चालते. त्यामुळे पक्षातील अनेक मातब्बर नेते नाराज आहेत. काही नेत्यांना तर पक्षाने बाजूला केले आहे. ही मंडळी पक्ष सोडून दुसरीकडेही जाऊ शकत नाही. कारण त्यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची आहे. पक्षात गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने गजानन बारवाल यांनी २०१४ मध्ये मनपा निवडणुकीमध्ये सेनेला जय महाराष्ट्र करून पदमपुरा वॉर्डातून अपक्ष निवडणूक लढविणे पसंत केले. त्यांना पराभूत करण्यासाठी सेनेने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, सेना नेत्यांना यश आले नाही. निवडून आल्यावर बारवाल यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. महापालिकेत त्यांनी अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या आघाडीचे प्रमुख बारवाल स्वत: आहेत.
भाजपने त्यांना आपल्या वाट्याचे सभापतीपदही दिले. त्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपत आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात बारवाल यांना ‘समाधान’कारक असे काम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा एक वर्ष सभापतीपद वाढवून मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. पुढील सभापतीपद सेनेच्या कोट्यात आहे. त्यामुळे सेना बारवाल यांना संधी देण्याचा प्रश्नच नाही. उलट सेनेत राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ व इतर ज्येष्ठ नगरसेवक या पदावर दावा ठोकत आहेत.
भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न
गजानन बारवाल सेनेत असताना त्यांना सभापती, महापौरपद देण्यात आले होते. एकदा विधानसभेचे तिकीटही सेनेनेच दिले होते. भविष्यात भाजपमध्ये खूप काही मिळणार नाही, त्यामुळे स्वगृही परत या, असा आग्रह सेनेच्या काही नेत्यांनी बारवाल यांच्यासमोर धरला आहे. बारवाल यांनी सेनेत परत येण्यासाठी इच्छाही व्यक्त केलेली नाही. येणारे सभापतीपद देण्याचे आश्वासन बारवाल यांना सेनेकडून देण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मी भाजपमध्ये सुखी आहे...
गजानन बारवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला. सध्या भाजपमध्ये मी खुश आहे. सेनेत परत जाण्याचा विचारही नाही. भाजपनेही मला खूप काही भरभरून दिले आहे.