छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक नागरिक अजूनही घंटागाडीत ओला व सुका कचरा एकत्र पद्धतीने देतात. त्यामुळे प्रक्रिया करताना प्रचंड त्रास होतो. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. १ जुलैपासून वर्गीकरण न करणाऱ्या आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना जबर दंड करण्याची घोषणा शुक्रवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी केली.
महापालिकेच्या घंटागाडीवर ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे गाणे लावले जाते; पण अनेकांना ते आवडत नाही. गाण्याचा आवाज कमी करावा अथवा गाणे बंद करण्याची सूचना मी दिल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. सफाईच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. शहराला देशात नंबर वन करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नागरिकांनीही थोडासा बदल स्वीकारला पाहिजे. नागरिकांनी घंटागाडीच्या आवाजावर विसंबून न राहता ॲपद्वारे आपल्या भागातील घंटागाडी कुठे आहे, आपल्या घरापर्यंत ती केव्हा येईल, याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. त्यासोबतच नागरिकांनी ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून दिले पाहिजे. वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांवर जून महिन्यात कारवाई केली जाणार नाही. मात्र १ जुलैपासून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
शहरात ७०० सीसीटीव्हीस्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेणे अधिक सोपे आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंड किती असेल, हे लवकरच जाहीर केले जाईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
५० लाखांपर्यंतची बक्षिसेशहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. ज्या भागात आस्थापना, गृहनिर्माण संस्था व इतर घटक चांगले काम करतील, त्यांना बक्षिसे दिले जातील. बक्षिसांची रक्कम ५० लाखांपर्यंत असेल, असे जी. श्रीकांत म्हणाले. कचरा व्यवस्थापनात काम करणारी उत्कृष्ट हॉटेल, रेस्टॉरंट, सलून, दुकाने, गृहनिर्माण संस्थांची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.