अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या वॉर्डात रस्त्याचा प्रश्न गंभीर
By Admin | Published: September 14, 2015 11:48 PM2015-09-14T23:48:20+5:302015-09-15T00:32:15+5:30
उन्मेष पाटील , कळंब विद्यमान नगराध्यक्षा मिराताई चोंदे व उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांच्या प्रभाग क्र. १ मध्ये सध्या रस्ते, नाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उन्मेष पाटील , कळंब
विद्यमान नगराध्यक्षा मिराताई चोंदे व उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांच्या प्रभाग क्र. १ मध्ये सध्या रस्ते, नाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय घर तेथे शौचालय द्यावे, ही या भागातील नागरिकांची मागणी अजूनही न.प. प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली नाही.
शहरातील प्रभाग क्र. १ मध्ये शासकीय झोपडपट्टी (इंदिरानगर) शेरी गल्ली, शिवाजी नगर, चोंदे गल्ली आदी भाग येतो. या प्रभागामध्ये सत्ताधारी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. या प्रभागातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटने बनविले आहेत. परंतु दोन-तीन वर्षातच या रस्त्यांनी माना टाकल्याचे चित्र दिसत आहे. या सिमेंट रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. या प्रभागातील नाल्यांचीही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी नाल्यांची पडझड झाल्याने नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आले आहे. पावसाळ्यात हेच पाणी घरातही शिरत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
शासकीय झोपडपट्टी भागात ‘घर तेथे शौचालय’ ही योजना राबविण्याची आवश्यकता आहे. या भागात अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या मोठी आहे. मोलमजुरी करुन उपजिवीका करणाऱ्या वर्गाला जेथे घराच्या चार भिंती उभा करताना कसरत करावी लागते तेथे शौचालयाचा खर्च परवडणारा नाही. यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेवून कमी जागेत उभा राहणारे शौचालय बांधून द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. या भागात न.प.ने सार्वजनिक शौचालय बांधले आहे. मात्र, त्याला शौचालयाला दरवाजे नाहीत, रस्ता नाही, वीज अन् पाणीही नाही. त्यामुळे या शौचालयाचा वापर करता येत नाही. शौचालयांची संख्याही तोकडी असल्याने त्याचा कोणालाच उपयोग होणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.
प्रभाग क्र. १ मधील बहुतांश नागरिक अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे त्यांना माफक दरात वैद्यकीय सुविधा तसेच औषधोपचार पुरविण्याची आवश्यकता आहे. खर्चिक औषधांमुळे अनेकदा उपचाराअभावी गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे या भागातील नागरिकांचे अनुभव आहेत. येथे नगर परिषदेने प्राथमिक सुविधासह वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली तर मोठा आधार मिळू शकणार आहे.