औरंगाबाद: शिवशंकर कॉलनीत भाड्याने घेतलेल्या दोन खोल्यामध्ये साठवून ठेवलेला ६ लाख ३० हजार रूपये किंमतीचा गुटखा जवाहरनगर पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. आमदार इम्तियाज जलील यांनी शिवशंकर कॉलनीतील गुटखा गोडावूनची पडताळणी केल्यानंतर पोलिसांना फोन करून तेथे बोलावून घेत कारवाई केली.
याविषयी अधिक माहिती अशी की, शिवशंकर कॉलनीतील रहिवासी सुखदेव आनदा व्यवहारे यांच्या मालकीच्या घर अडिच महिन्यापूर्वी शितल बाबुलाल बोरा(रा. अरिहंतनगर) याने भाड्याने घेतले होते. या गोडावूनमधून शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांना ठोकदरात मालाचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार इम्तियाज जलील यांनी गुरूवारी (दि. २१) दुपारी १ वाजेच्या सुमारास तेथे धाव घेतली आणि पोलिसांना बोलावून घेतले.
जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, पोलीस कर्मचारी सुनील बडगुजर, समाधान काळे आणि कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेऊन घराची झडती घेतली असता तेथे दोन खोल्यांमध्ये बाबा, माणिकचंद नावाच्या गुटख्यांचे पाऊच आणि पान मसाला, सुगंधी तंबाखूच्या गोण्यांची थप्पी रचलेली दिसली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून घेत कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, योगेश कनसे, निरूपमा महाजन आणि जोत्सना जाधव यांच्या पथकाने धाव घेऊन पंचनामा केला तेव्हा तेथे सुमारे ६ लाख ३० हजाराचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा मिळाला.