सोयगाव ( औरंगाबाद ) : निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून एका सात वर्षिय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बनोटी (ता.सोयगाव) येथे गुरुवारी (दि.२९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आशा चंद्रभान आहिरे ( ७, रा. बेलखेडा ता कन्नड ) असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.
कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील एक कुटुंब घाटमाथ्यावर काही दिवसांपासून मेढ्या चराईसाठी आले होते. ते परतीच्या मार्गावर असताना बनोटी येथील ग्रामस्वच्छालयाच्या इमारतीच्या बाजूस रिकाम्या जागेवर थांबले होते. दरम्यान, घरातील मंडळी जवळच मेंढ्या चारत होते. येथेच महसूल विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी मोठा हौद बांधला आहे. यात पाणी साठवून ठेवले होते. आशा खेळतखेळत अचानक हौदात पडली. यावेळी जवळ कोणीच नसल्याने हे कोणाच्या लक्षात आले नाही. काही वेळाने आशा मुलगी दिसत नसल्याने आईने शोधाशोध केली. काही अंतरावरील पाण्याच्या हौदात आशाचा मृतदेह आढळला.
पाण्याची टाकी झाकण्याची मागणीनिर्माणाधीन इमारतीजवळच वस्ती असल्याने लहान मुले येथे खेळत असतात. यामुळे पुढे अशी घटना घडण्याची शक्यता आहे. यामुळे ठेकेदाराने हौदावर आच्छादन टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित ठेकेदारास जबाबदार धरले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.