औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद जवान किरण थोरात यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चाैक्यांवर गोळीबार केला. यात वैजापूर तालुक्यातील फरीदाबाद येथील रहिवासी जवान किरण थोरात यांना वीरमरण आले.
शहीद किरण पोपटराव थोरात यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (13 एप्रिल) सकाळी 11.30 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील हजारोंच्या समुदायाने ''किरणभाऊ अमर रहे'', अशी घोषणा करताच फकिराबादवाडी गहिवरून गेली. पाकिस्तानच्या गोळीबारात किरण थोरात यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथून मूळगावी फकिराबादवाडीत आणण्यात आले. यावेळी शहीद किरण थोरात यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तरूण मंडळींसहीत आबालवृद्धांनी गर्दी केली होती. म्हसोबा चौक येथून शहीद किरण थोरात यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ''किरण थोरात अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जय'' या घोषणांनी आसमंत व्यापून गेला. तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा धिक्कार केला.
त्यानंतर किरण थोरात यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी शहीद जवानाच्या आई, पत्नीने हंबरडा फोडताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले. अंत्यदर्शनानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी, आईवडील, पत्नी यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. भाऊ अमोल थोरात यांनी शहीद किरण थोरात यांना मुखाग्नी दिला. शहीद किरण थोरात यांना जिल्हा तालुक्यासह पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांनी अखेरचा निरोप दिला.
किरण थोरात यांंच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक दोन वर्षांची मुलगी आहे. त्याआधी गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने पूंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले होते.
किरण थोरात यांच्याविषयीची माहितीकिरण यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण लाडगाव (ता. वैजापूर) येथील न्यू हायस्कूलमध्ये तर बारावीपर्यंतचे शिक्षण वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात घेतले. 2 मार्च 2013 रोजी येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर ते सैन्यदलात भरती झाले. वडिलांची बुलेटची इच्छा केली पूर्ण वडिलांना बुलेट गाडी घेऊन देण्याचे किरण थोरात यांचे सैन्यात भरती झाल्यापासूनचे स्वप्न होते. दोन महिन्यांपूर्वी सुटीवर आले असताना ते त्यांनी पूर्ण केले. वडिलांना काहीही न सांगता त्यांना औरंगाबादला नेले. तेथील शोरूममधून नवीन बुलेट गाडी घेऊन ती वडिलांना ‘गिफ्ट’ दिली होती.