एसटी महामंडळाची बसस्थानकासाठी शहागंज येथे दोन एकर पर्यंत प्रशस्त जागा असून येथून पूर्वी विविध ठिकाणी शहर व परगावासाठी सुध्दा येथून बसेसची ये-जा होत असे. परंतु एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाअभावी या जागेला अक्षरशः डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झालेले असून येथे नागरिक शौच व लघुशंकाही करताना दिसतात.
या ठिकाणी कोणीही येऊन हवा तेवढा ओला आणि सुका कचरा बिनधास्तपणे टाकत असल्याने या भागात खूपच दुर्गंधी पसरलेली आहे. येथे टवाळखोरांचा मद्याच्या मैफिलीही रंगतात. मद्य, गांजा सेवन केल्यानंतर मद्याच्या रिकाम्या बाटल्या त्या ठिकाणी फेकल्या जातात. जुगार डावही खेळला जातो. शहागंज चमन पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असताना हे सारे येथे बिनधास्त चालू आहे. बसस्थानकाजवळच महाराष्ट्र हिंदी विद्यालय व डॉ.जाकिर हुसेन हायस्कूल आहे. बसस्टँडजवळ व्यापारी संकुले व धर्मशाळाही आहेत, त्यांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. संबंधितांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढून या मोकळ्या जागेचा विकासकामांतर्गत कायापालट करावा, अशी मागणी होत आहे.