पंचायत राज निवडणुकीसाठी २० रोजी शरद पवार औरंगाबादेत
By Admin | Published: October 12, 2016 12:52 AM2016-10-12T00:52:39+5:302016-10-12T01:14:48+5:30
औरंगाबाद : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी २० आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे औरंगाबादमध्ये येत असून,
औरंगाबाद : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी २० आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे औरंगाबादमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा भव्य विभागीय मेळावा होणार आहे.
राज्यात येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकांच्या निमित्ताने खा. पवार यांनी विभागीय मेळावे सुरूकेले आहेत. मराठवाड्यात १५ आॅक्टोबरनंतर मेळावा होणार असल्याचे ‘लोकमत’ने आधीच प्रसिद्ध केले होते. मराठा समाजाच्या मुंबईत निघणाऱ्या संभाव्य मोर्चाची तारीख आता पुढे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने २० आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. बीड बायपासवरील एका मैदानावर हा मेळावा होणार
आहे.
मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा दौरा अद्याप निश्चित नाही. मेळाव्याच्या तयारीची जबाबदारी जिल्हाध्यक्ष आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आणि पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहेत. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाची ठिणगी औरंगाबादमधून पडली. त्यानंतर अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, असे वक्तव्य खा. पवार यांनी औरंगाबादेतच सर्वप्रभम केले होते. त्यामुळे औरंगाबादेतील मेळाव्यात पक्ष आणि खा. पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पक्षाच्या दृष्टीने पंचायत राज निवडणुकीची तयारी म्हणून हा मेळावा होणार आहेत. शिवाय पंचायत निवडणुका एकट्याने लढविण्याबाबतची चाचपणीही या विभागीय मेळाव्याद्वारे होणार आहे.