भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजय झाल्यामुळे भाजपच्या खोपट कार्यालयाबाहेर ढोल-ताशे वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालुन नृत्य करीत विजय साजरा केला. शिक्षकांना शिक्षकांचे प्रश्न मांडणारा आमदार हवा होता, म्हणूनच ३१ शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला, कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली. त्यामुळेच, हा विजय झाल्याचे भाजपचे प्रभारी राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. तर, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
गेल्या सहा महिन्यांच्या काळात युती सरकारने शिक्षकांना ११०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यासह शिक्षकहिताचे विविध निर्णय घेतले. या कार्याचा शिक्षकांनी सन्मान केला आहे. या निवडणुकीतील प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या, असं भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. मात्र, अद्याप पूर्ण निकाल लागला नाही, त्यामुळे निकालापूर्वीच उमेदवार निवडून आलं म्हणणे चुकीचं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला. पण. कोकणात जर भाजपचा एखादा उमेदवार निवडून येत असेल आणि शिंदे गटाचा येत नसेल तर भाजपाच्या विस्तारासाठी शिवसेनेला फोडण्यात आल्याचं सिद्ध होईल, असे रोहित पवार यांनी म्हटलं. महाराष्ट्रात आणि ज्या ठिकाणी शिवसेना होती, त्याठिकाणी शिवसेनेला तोडण्यात आलं आणि त्याचा वापर करून भाजप आपलं काम शांतपणे करत आहे, हेच या निकालातून सिद्ध होईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
अद्याप कोकणचा निकाल आलेला नाही - पवार
कोकण मतदारसंघाचा अजून निकाल लागलेला नाही, ज्यावेळी निकाल लागेल तेव्हा कळेल अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. कार्यकर्ते उत्साहामध्ये बॅनर लावतात, उमेदवार सांगत नाही. कार्यकर्ते उत्साहाने बॅनर लावतात, ज्यावेळी सगळ्या मतपेट्या फुटतील त्यावेळेला निकाल समोर येईल, असंही आमदार रोहित पवार म्हणाले.